उच्च शिक्षणात बदलांची चाहूल

    दिनांक :05-Apr-2026
Total Views |
- पीएचडीसाठी दुहेरी संधी, एमबीएला मात्र प्रतिसाद कमी
- 'पेट' परीक्षा वर्षातून दोनदा तर एमबीए प्रवेश प्रक्रियेत विलंबामुळे जागा रिक्त

नागपूर, 
राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात एकीकडे सकारात्मक बदल होत असताना, दुसरीकडे काही अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशाबाबत चिंताजनक स्थिती दिसून येत आहे. Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांनी पीएचडी प्रवेश प्रक्रियेत महत्त्वपूर्ण सुधारणा जाहीर करत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. आता पीएचडी प्रवेश परीक्षा (पेट) वर्षातून दोनदा घेतली जाणार असून, तिची वैधता तीन वर्षांसाठी ठेवण्यात आली आहे.
 
 
phd
कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी सांगितले की, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध होतील आणि संशोधन क्षेत्रात प्रवेश करणे अधिक सुलभ होईल. यंदाची पेट परीक्षा दिनांक ९ ते १२ मे दरम्यान ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया दिनांक १० एप्रिलपासून सुरू होणार असून, प्रवेशपत्रे केवळ उमेदवारांच्या लॉगिनमधूनच डाउनलोड करावी लागतील.
दरम्यान, एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रमांबाबत मात्र वेगळे चित्र दिसत आहे. सीईटी परीक्षेसाठी नोंदणी मोठ्या प्रमाणावर होत असली, तरी प्रत्यक्ष प्रवेशांमध्ये मोठी तफावत आहे. २०२५-२६ मध्ये ५० हजार ५०० जागांपैकी केवळ ४२ हजार २०७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, परिणामी सुमारे १७ टक्के जागा रिक्त राहिल्या. मागील वर्षीही १६ टक्के जागा भरल्या नव्हत्या.
सीईटी परीक्षा यंदा दिनांक ६, ७, ८ एप्रिल व ८ मे अशा दोन टप्प्यांत घेतली जात असली, तरी प्रवेश प्रक्रियेतील विलंबामुळे विद्यार्थी खासगी व स्वायत्त विद्यापीठांकडे वळत आहेत. नागपूरमधील महाविद्यालयांच्या प्राचार्यांनीही या विलंबावर नाराजी व्यक्त केली असून, वेळेत प्रवेश न मिळाल्याने विद्यार्थ्यांचा कल बदलत असल्याचे त्यांनी नमूद केले.
Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University  नागपूर विद्यापीठांतर्गतही हीच स्थिती असून, २०२५-२६ मध्ये ६ हजार ६०० जागांपैकी ९.५० टक्के जागा रिक्त राहिल्या. त्यामुळे प्रवेश व्यवस्थेतील त्रुटी आणि नियोजनाचा अभाव यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. एकूणच, पीएचडीसाठी सकारात्मक निर्णय घेतला जात असताना, एमबीए प्रवेश प्रक्रियेतील अडचणी दूर करण्याची गरज अधोरेखित होत आहे.
- पीएचडी (पेट) परीक्षा वेळापत्रक
ऑनलाइन अर्ज सुरू: १० एप्रिल २०२६
अर्जाची अंतिम तारीख: २३ एप्रिल २०२६
हार्ड कॉपी अंतिम तारीख: २७ एप्रिल २०२६
कागदपत्र पडताळणी: ३० एप्रिल २०२६
प्रवेशपत्र: ३ मे २०२६
परीक्षा: ९ ते १२ मे २०२६