भागवतकार कथाव्यास युवराज महाराज यांच्या वाणीतून भागवत कथेचे आयोजन
आजनसरा,
Saint Bhojaji Maharaj संत भोजाजी महाराज श्रीक्षेत्र आजनसरा येथे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवार ७ ते १४ एप्रिलपर्यंत भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कथावाचक म्हणून भागवतकार कथाव्यास युवराज महाराज हे राहतील. कै. देवाजी महाराज यांनी शके १८७७ ईसवी सन १९५५ पासून आजनसरा वासीयांच्या सहाय्याने पुण्यतिथी सोहळ्याची सुरूवात केली. पुण्यतिथी महोत्सवाच्या सुरवातीला ७ एप्रिल सकाळी ८ वाजता रामाजी पर्बत यांच्या हस्ते कलश स्थापना व विणा सुरू करून दैनंदिन कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.
सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमात पहाटे ५ ते ६ पर्यंत काकडा आरती, सकाळी ९ ते दुपारी १२ व रात्री ८ ते ११ या वेळात भागवत कथा, दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत कीर्तन, भजन, हरिपाठ व प्रार्थनेचे आयोजन भागवतकार कथाव्यास युवराज श्रीजी महाराज यांच्या वाणीतून आयोजन करण्यात आले आहे. तसेच दुपारी १ ते ३ पर्यंत संत भोजाजी महाराज महिला भजन मंडळ, आजनसरा यांच्या भजनाचा कार्यक्रम, बुधवारी दुपारी १ ते ३ या वेळात सागर महाराज नांदुरकर यांचे भारुड, ९ रोजी पोटदुखे महाराज जऊळगाव यांचे कीर्तन, १० रोजी मोहन महाराज गंडाईत यांचे कीर्तन, ११ रोजी रामायणाचार्य वाल्मिक हुलके महाराज यांच्या अमृत वाणीतून आध्यात्मिक कीर्तन होईल. १२ रोजी सुमित महाराज अमरावतीकर यांचे भारूड, दुपारी २ ते ३ या वेळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कांचन गडकरी यांच्या हस्ते संत भोजाजी महाराज समाधीस्थळी अभिषेक व महापूजा होणार आहे.
Saint Bhojaji Maharaj दुपारी ३ ते ४ या वेळात कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. १३ रोजी गजानन महाराज गुजरकर यांचे एकादशी पर्वावर कीर्तन, १४ रोजी सकाळी ९ ते १२ या वेळात युवराज श्रीजी महाराज यांचे गोपालकाल्याचे कीर्तन, दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत महाप्रसाद, रात्री ८ वाजता दिंडी स्पर्धेला सुरूवात होणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थान कमिटीचे अध्यक्ष डॉ. विजय पर्बत, उपाध्यक्ष धनराज मेश्राम, सचिव शिवदास पर्बत, राजेंद्र ढवळे, नामदेव गाढवे, रामाजी कोपरकर, रमेश ठाकरे, आदींनी केले आहे. दिंडी स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रभाकर कोपरकर, प्रभाकर पारवटकर, हंसराज तिमांडे, संजय कोसूरकर, गणेश काचोळे, आदींशी संपर्क साधण्याचे आवाहन देवस्थान विश्वस्त मंडळाकडून करण्यात आले आहे.