शेतकर्‍यांसाठी अझोला प्रात्यक्षिक युनिटची उभारणी

    दिनांक :05-Apr-2026
Total Views |
पळसगावच्या नावीन्य उपक्रमाचे कौतुक
 
सिंदी (रेल्वे), 
Setting up of Azolla demonstration unit ग्रामीण भागातील शेती आणि पशुपालन अधिक सक्षम व किफायतशीर व्हावे, यासाठी पळसगाव ग्रापंतर्फे शेतकर्‍यांसाठी अझोला प्रात्यक्षिक युनिटची उभारणी करण्यात आली आहे. हा एक नावीन्यपूर्ण आणि मार्गदर्शक उपक्रम ठरत आहे. मिशन समृद्धीच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून हा प्रयोग केल्या जात आहे. मिशन समृद्धीचे कॉर्डिनेटर विकी आणि वैशाली गोल्हर यांनी पुढाकार घेत कमी खर्चात जास्त उत्पादन आणि पशुखाद्यासाठी उत्तम पर्याय उपलब्ध करून देण्याचा संकल्प जाहीर केला. पशुपालकांना खर्च कमी करता यावा याकरिता पर्यायी पोषण आहार देण्याबाबत उपक्रमाची सुरूवात केली. या उपक्रमामुळे शेतकर्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
 
 
Ajhola
 
अझोला हे एक प्रकारची जल वनस्पती असून ते प्रथिनांनी समृद्ध आहे. विशेषतः गाई, म्हशी, शेळ्या आणि कोंबड्यांसाठी हा पौष्टिक आहार म्हणून उपयोगी ठरतो. पशुखाद्याच्या वाढत्या किमतीमुळे शेतकर्‍यांवर आर्थिक ताण वाढत असताना अझोला स्वस्त, सहज उपलब्ध आणि घरच्या घरी तयार करता येणारा पर्याय ठरतो. हे लक्षात घेऊन ग्रामपंचायत परिसरात शेतकर्‍यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्याचा निर्णय ग्रामपंचायत व मिशन समृद्धी यांनी घेतला.
 
 
Setting up of Azolla demonstration unit  या उपक्रमांतर्गत गावात एक आदर्श अझोला युनिट उभारण्यात आले आहे. फत ७ ते १० दिवसात अझोला तयार होतो आणि त्यानंतर दररोज त्याचा पशुखाद्यासाठी वापर करता येतो. या प्रक्रियेचे प्रात्यक्षिक शेतकर्‍यांना वैशाली गोल्हर व विकी यांनी शेतकर्‍यांना करून दाखवले. त्यानंतर शेतकर्‍यांना अझोलाचे फायदे, त्याची लागवड पद्धत, देखभाल आणि वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शेतकर्‍यांनी आपल्या घरीही अझोला युनिट उभारण्याची तयारी यावेळी दर्शवली. या उपक्रमामुळे पशुपालन व्यवसायाला मोठा हातभार लागणार आहे. अझोलामध्ये प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असल्यामुळे जनावरांचे आरोग्य सुधारते, दूध उत्पादनात वाढ होते आणि जनावरांची रोगप्रतिकारक शतीही वाढते.
 
 
याशिवाय अझोला शेतीमध्ये सेंद्रिय खत म्हणूनही उपयोगी पडतो. शेतात अझोलाचा वापर केल्यास जमिनीची सुपिकता वाढते आणि रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होते. ग्रामपंचायतने सदर उपक्रमासाठी आवश्यक साहित्य व तांत्रिक मदत उपलब्ध करून दिली आहे. गावातील प्रगत शेतकर्‍यांनी या उपक्रमाचे कौतुक करत इतर गावांसाठीही हा एक आदर्श ठरेल, असे मत व्यत केले. उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक शेतकरी सॉईल सन अ‍ॅग्रोटेक फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरत आहे.