सुपर डुपर’ : कौटुंबिक विनोद आणि भावनांची हलकीफुलकी मेजवानी

    दिनांक :05-Apr-2026
Total Views |
मुंबई
Super Duper Marathi movie मराठी सिनेसृष्टीत कौटुंबिक विनोदी चित्रपटांना नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळत आली आहे. भावनांची गुंफण, नातेसंबंधांची उकल आणि हलक्याफुलक्या विनोदाची जोड यामुळे असे चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करतात. अशाच धाटणीचा ‘सुपर डुपर’ हा नवा मराठी चित्रपट ३ एप्रिलपासून चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांना मनोरंजनाची वेगळी अनुभूती देण्याचा प्रयत्न करत आहे.
 

Super Duper Marathi movie 
दिग्दर्शक समीर पाटील यांच्या या चित्रपटात विनोद, गोंधळ, नात्यांची गुंतागुंत आणि अनपेक्षित वळणांची रंजक मांडणी पाहायला मिळते. चित्रपटात ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले यांनी प्रमुख भूमिका साकारल्या असून, त्यांच्या अभिनयातून आधुनिक तरुणांच्या आयुष्यातील संघर्ष प्रभावीपणे उभा राहतो. रोहित आणि ईशा हे मुंबईत ‘लिव्ह-इन’मध्ये राहणारे तरुण जोडपे. रोहित हा गायक होण्यासाठी धडपडणारा तरुण, तर ईशा अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पाहते. महानगरातील वाढत्या घरभाड्यांमुळे आणि बिनलग्नाच्या नात्यामुळे त्यांना वारंवार घर बदलावे लागते.
 
 
अनेक अडचणींवर Super Duper Marathi movie  मात करत अखेर हे दोघे स्वतःचा फ्लॅट खरेदी करतात. मात्र, त्यांच्या आयुष्यातील आनंदाचा हा क्षण फार काळ टिकत नाही. कारण, ज्या घराचा ते मालक असल्याचा समज करतात, तेच घर एका एजंटने जाधव कुटुंबालाही विकलेले असते. गावाहून शहरात स्थलांतरित झालेल्या जाधव कुटुंबाची कथा या चित्रपटाला वेगळी दिशा देते. दुष्काळामुळे उद्ध्वस्त झालेल्या या कुटुंबात परंपरा, नातेसंबंध आणि एकमेकांवरील विश्वास यांना मोठे स्थान आहे. एका बाजूला आधुनिक विचारांचे रोहित-ईशा आणि दुसऱ्या बाजूला पारंपरिक मूल्य जपणारे जाधव कुटुंब, असा दोन भिन्न जगांचा संघर्ष या कथेत रंगतो.
घरावर नेमका हक्क कोणाचा, या प्रश्नाभोवती कथा फिरत राहते आणि त्यातून अनेक विनोदी तसेच भावनिक प्रसंग उलगडत जातात. चित्रपटात सामाजिक वास्तवाची झलकही दिसते. परंपरा आणि आधुनिक जीवनशैलीतील संघर्ष, बदलती कौटुंबिक मूल्ये आणि संवादाची गरज हे मुद्दे दिग्दर्शकाने सहज आणि प्रभावीपणे मांडले आहेत. विशेष म्हणजे, या सर्व विषयांना उपदेशात्मक सूर न देता हलक्याफुलक्या शैलीत सादर करण्याचा प्रयत्न चित्रपटात जाणवतो.
 
 
सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी संजय जाधव यांनी समर्थपणे सांभाळली असून, दृश्यात्मक मांडणी कथेला पूरक ठरते. चित्रपटातील काही संवाद विशेष लक्ष वेधून घेतात आणि कथेला भावनिक खोली देतात. मात्र, कथानकातील काही भाग अंदाज लावण्याजोगा वाटतो. विशेषतः उत्तरार्धात काही प्रसंग लांबलेले जाणवतात, ज्यामुळे चित्रपटाची गती मंदावते. काही पात्रांची पार्श्वभूमी अधिक सविस्तर दाखवली असती, तर कथेला अधिक बळ मिळाले असते.
असे असले तरी, ‘सुपर डुपर’ हा केवळ विनोदी चित्रपट न राहता एक भावनिक प्रवास ठरतो. कुटुंब, नाती आणि आयुष्यातील छोट्या-छोट्या आनंदांचा अर्थ हलक्या शैलीत मांडणारा हा चित्रपट प्रेक्षकांना हसवतानाच विचार करायलाही भाग पाडतो. एकूणच, हलक्याफुलक्या मनोरंजनासोबत आशयपूर्ण कथानक अनुभवायचे असेल, तर ‘सुपर डुपर’ हा चित्रपट एक योग्य पर्याय ठरतो.