हत्तींच्या धुमाकुळासमोर वनविभाग हतबल !

    दिनांक :05-Apr-2026
Total Views |
 शेतकरी भयभीत, प्रशासनाच्या विरोधात संताप
 
अर्जुनी मोरगाव, 
Terror of elephants गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या तालुक्यातील वडेगाव (बंध्या), खोळदा आणि पुष्पनगर परिसरात रानटी हत्तींच्या कळपाने अक्षरशः हाहाकार माजवला असून, शेतकर्‍यांच्या मक्का पिकासह उन्हाळी धान व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. या सततच्या हल्ल्यांमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचत आहे. कष्टाची उभी शेती काही तासांत उद्ध्वस्त होत असताना या हत्तींसमोर वन विभाग हतबल झाले आहे. त्यामुळे शेतकरी भयभीत झाले असून वनविभागाच्या विरोधात शेतकर्‍यांमध्ये संताप पसरत आहे.
 
 
hatti
 
गेल्या महिनाभरापासून ३० ते ३५ हत्तींचा कळप वडेगाव-बंध्या परिसरातील गाढवी नदीकाठ व लगतच्या जंगल शिवारात ठाण मांडून आहे. दिवसभर जंगल परिसरात वावरणारे हे हत्ती रात्रीच्या अंधारात शेतात घुसून धान, मका आणि इतर पिकांचा अक्षरशः चुराडा करत आहेत. परिणामी, या भागातील शेतकर्‍यांसह नागरिकांमध्ये प्रचंड दहशत व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, या गंभीर परिस्थितीची दखल घेत स्वतः आ. राजकुमार बडोले यांनी दोन वेळा या भागाचा प्रत्यक्ष दौरा करून परिस्थितीची पाहणी केली व वनविभागाला हत्तींचा बंदोबस्त करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहे. मात्र, आमदारांच्या सूचनांचाही वनविभागावर परिणाम झालेला नाही. काही वेळासाठी हालचाल दाखवून वनविभागाकडून केवळ दिखाऊ कारवाई केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात परिस्थिती ‘जैसे थे’ असून हत्तींचा धुमाकूळ आणि शेतकर्‍यांचे हाल अजूनही कायम आहेत.
 
 
...तर गोंदियात का नाही ?
Terror of elephants गडचिरोली वनविभागाने दक्षता घेत विविध उपाययोजना राबवून हत्तींच्या कळपाला आपल्या क्षेत्रातून हुसकावून लावले. मात्र, त्यानंतर या हत्तींच्या कळपाने तालुक्यातील वडेगाव-बंध्या परिसरात आपले बस्तान मांडले. मात्र, महिना लोटत असताना या भागातून या कळपाला हाकलण्यात गोंदिया वन विभागाला यश आले नाही. यावरून गडचिरोली वनविभाग हत्तींचा प्रभावी बंदोबस्त करू शकतो, तर गोंदिया वनविभाग का अपयशी ठरत आहे? असा सवाल शेतकरी आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.