वर्धेत लग्नाच्या वरातीत दुहेरी हत्याकांड

    दिनांक :05-Apr-2026
Total Views |
धारदार चाकूने काका-चुलत भावाचा खून
अल्पवयीनास अटक, महिला आश्रम परिसरातील घटना
 
वर्धा, 
Wardha: Double murder लग्न आटोपून परत येत असलेल्या वरातीत दबा धरून असलेल्या अल्पवयीन मुलाने आपल्या चुलत भावावर चाकूने सपासप वार केले. मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या काकावरही हल्ला केल्याने तेही गंभीर जखमी झाले. महिला आश्रमजवळील हनुमान मंदिर परिसरात शनिवार ४ रोजी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेत वडील आणि मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिसांनी १७ वर्षीय अल्पवयीन मुलास अटक केली. रितेश प्रभाकर भलमे (२५) आणि प्रभाकर फुलचंद भलमे (५४) रा. बरबडी अशी मृतकांची नावे आहेत. तर अल्पवयीन आरोपी हा प्रभाकर भलमे यांचा पुतण्या आहे.
 
 
murder
 
Wardha: Double murder पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हसाळा येथील रहिवासी गजानन वाळके यांच्या घरी विवाह सोहळा होता. बरबडी येथील रहिवासी प्रभाकर, मुलगा रितेश आणि इतर कुटुंबीयांसह या सोहळ्याला उपस्थित होते. वायगाव (निपाणी) येथे विवाह सोहळा पार पडल्यानंतर वरातीतील सर्व सदस्य रात्री उशिरा ट्रॅव्हल्सने वर्धेत पोहोचले. प्रभाकर आणि रितेश हे बॅण्ड पथक आणि कुटुंबीयांसह महिलाश्रमाजवळील हनुमान मंदिराच्या जवळ उतरले. प्रभाकरचा १७ वर्षीय अल्पवयीन पुतण्या हा आधीच हनुमान मंदिराच्या जवळ दबा धरून बसून होता. वरात येताच त्याने चुलतभाऊ रितेशवर धारदार चाकूने सपासप वार केले. मुलाला वाचवण्यासाठी आलेले प्रभाकरही या हल्ल्यात जखमी झाले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे वरातीत गोंधळ सुरू झाला. जखमींना तात्काळ रुग्णालयात हलविले. मात्र, डॉटरांनी दोघांनाही मृत घोषित केले. रितेशच्या पाठीला, डोयाला आणि चेहर्‍याला गंभीर दुखापत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर, ठाणेदार संतोष ताले आणि इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून चाकू जप्त केला.
 
 
चाकूची ऑनलाइन खरेदी
चौकशीदरम्यान, हत्येच्या इराद्याने आरोपीने काही दिवसांपूर्वी एका ऑनलाइन शॉपिंग साइटवरून चाकू खरेदी केला होता. गेल्या पाच वर्षांपासून आरोपी आणि मृतकांमध्ये जमिनीच्या वादातून अनेकदा खटके उडायचे. त्यामुळे वर्धा आणि सेवाग्राम पोलिस ठाण्यांमध्ये परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. मृत प्रभाकर हे स्टेशनरीचे दुकान तर त्यांचा मुलगा रितेश हा नुकताच एका कंपनीत कामाला लागला होता. आरोपी धुमाल बँड पथकात काम करतो. शहर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून ठाणेदार संतोष ताले यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.