गोंदिया जिल्ह्यावर ‘अवकाळी’चे ढग !

    दिनांक :05-Apr-2026
Total Views |
- मका, भाजीपाला व फळबागांवर संकट : शेतकरी चिंतातूर

गोंदिया,
Yellow alert in Gondia district गेल्या पाच दिवसांपासून दिवसभर कडक उन्ह तापल्यानंतर सायंकाळच्या सुमारास आकाशात ढगांची जत्रा भरत आहे. जिल्ह्यात पाच दिवसांपूर्वी आलेल्या वादळाने मका पीक शेतात पडून असतानाच काल, शनिवारी रात्रीच्या सुमारास तुरळक पाऊस व आज, रविवारी ५ एप्रिल रोजी पहाटेपासूनच आकाशात ढगांनी गर्दी केल्याचे चित्र होते. तर दुसरीकडे हवामान खात्याने पुढील चार दिवस जिल्ह्यात येलोअलर्टचा इशारा दिला आहे. त्यामुळे मका, भाजीपाला व फळबागांवर अवकाळीचे संकटकायम असल्याचे चित्र असून शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
 
 
pik
 
Yellow alert in Gondia district  गेल्या आठवड्यापासून हवामान खात्याकडून सातत्याने जिल्ह्यात वादळी वार्‍यासह काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, या अंदाजानुसार जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव तालुका वगळता कुठेही वादळ व तुरळक पावासाव्यतिरीक्त जोरदार पावसाची नोंद झालेली नाही. असे असले अर्जुनी मोरगाव तालुक्यात वादळ वार्‍यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी मका पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यात पुन्हा तिच परिस्थिती ओढावली असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस येलो अलर्ट घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे काही ठिकाणी हलका ते मध्यमपाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशावेळी जर पावसाने जोर धरल्यास आधीच बाधित झालेल्या मका पिकासह इतरही पिकांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.
 
 
नुकसान भरपाई द्यावी...
सततच्या बदलत्या वातावरणामुळे मका पिकासह आंबा, टमाटर, भाजीपाला आणि इतर फळझाडांची फुले व फळे गळून पडत आहेत. त्यामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान होत आहे. तेव्हा प्रशासनाने नुकसानीचा आढावा घेत पंचनामा तयार करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.
 
 
दमट वातावरणाचा फटका...
हवामान खात्याकडून जिल्ह्यात ४ ते ८ एप्रिल या कालावधीत पावसाची शक्यता वर्तवित अलो अलर्ट जारी केला आहे. त्या तुलनेत आतापर्यंत जिल्ह्यात जोरदार पाऊस झालेला नाही. असे असले तरी दिवसभर उन्ह तापत असून सायंकाळी ढग दाटून येत असल्याने दमट वातारणाचा फटका गोंदियाकरांना सहन करावा लागत आहे.