वॉशिंग्टन
Artemis-2 पृथ्वीच्या निर्मितीपासूनचा आतापर्यंतचा प्रवास उलगडण्यासाठी आता चंद्राची मदत घेतली जाणार आहे. नासाच्या आगामी आर्टेमिस-2 मोहिमेद्वारे अंतराळवीर चंद्रावरील विवरांचा सखोल अभ्यास करणार आहेत, अशी माहिती नासाचे अंतराळवीर ख्रिस विल्यम्स यांनी दिली आहे.
Artemis-2 विल्यम्स यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आर्टेमिस टीम जेव्हा चंद्राच्या जवळ पोहोचेल तेव्हा त्यांना चंद्राचा पृष्ठभाग अतिशय स्पष्टपणे आणि जवळून पाहता येईल. विशेषत: चंद्राच्या दूरच्या बाजूला असलेली विवरे ही लक्षवेधी आहेत. ती आपल्या सूर्यमालेत घडलेल्या प्राचीन आघातांचा जिवंत पुरावा आहेत. चंद्रावर वातावरणाचा अभाव असल्याने तिथे पृथ्वीसारखी झीज होत नाही. त्यामुळे ही विवरे आजही सुरक्षित असून पृथ्वी आणि चंद्राच्या सभोवतालच्या प्राचीन परिस्थितीची एक प्रकारची ऐतिहासिक नोंद म्हणून काम करत आहेत.
पृथ्वीची माहिती मिळणार
Artemis-2 पृथ्वीच्या इतिहासात अनेकदा मोठे उल्कापात किंवा आघात झाले आहेत, ज्याचे परिणाम आपल्या ग्रहावर खूप गंभीर स्वरूपात झघले आहेत. डायनासोरचे नष्ट होणे हे त्याचे एक उदाहरण मानता येईल. पण, पृथ्वीवर सतत होणारे बदल, वारा-पावसामुळे होणारी धूप आणि ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे या आघातांच्या खुणा पुसल्या गेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला पृथ्वीच्या जुन्या इतिहासाबद्दलची माहिती मिळत नाही. पण, चंद्रावर हे बदल होत नसल्याने तिथे आजही त्या जुन्या खुणा तशाच आहेत. म्हणून चंद्राचा अभ्यास केल्यास पृथ्वीच्या भूतकाळातील अनेक अनपेक्षित आणि रंजक गोष्टी समजण्यास मदत होईल, असे विल्यम्स म्हणाले.