श्रीरामपूर,
bait-of-marriage-sexual-abuse : श्रीरामपूरमध्ये लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी (रा. संजयनगर, श्रीरामपूर) याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी घरकाम करून आपला उदरनिर्वाह करत होती. तिचा २०१९ मध्ये विवाह झाला होता, मात्र वैवाहिक आयुष्यातील वादामुळे ती माहेरी राहत होती. याच काळात तिची ओळख आरोपीशी झाली. सुरुवातीला फोनवरून संवाद साधत आरोपीने तिचा विश्वास जिंकला आणि नंतर लग्नाचे आश्वासन देत तिच्याशी संबंध प्रस्थापित केले.
२०२२ पासून आरोपीने वारंवार फसवणूक करत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. इतकेच नव्हे, तर तिला घटस्फोट घेण्यास भाग पाडून शिरसगाव येथे भाड्याच्या खोलीत दोघे पती-पत्नीप्रमाणे राहू लागले. मात्र, या काळातही आरोपीकडून तिचे शोषण सुरूच राहिल्याचा आरोप आहे.
दरम्यान, मार्च २०२६ मध्ये आरोपी दुसऱ्या मुलीशी विवाह करत असल्याची माहिती पीडितेला मिळाली. या धक्क्यामुळे तिने टोकाचा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान आरोपीने दुसरे लग्न केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतरही आरोपीने तिला मारहाण करून घराबाहेर काढल्याची तक्रार करण्यात आली आहे.
या प्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे पुढील तपास करत आहेत.