पुणे,
chandrashekhar-bawankule : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला थेट इशारा दिला आहे. आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीत पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्याआधी सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बावनकुळे बोलत होते. त्यांनी म्हटले, “काँग्रेसने बारामतीत निवडणूक लढवली तर महाराष्ट्र तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव बारामतीत मिळेल.”
बावनकुळे म्हणाले की, “अजित पवार यांनी सर्वांच्या हृदयावर राज्य केले आहे आणि आज त्यांची आठवण पावला पावलावर जाणवते. सुनेत्रा ताईंनी विधिमंडळ आणि मंत्रिमंडळात आपली ताकद दाखवली आहे. देवेंद्रजींनी सांगितलं आहे की बारामतीमध्ये सर्वाधिक मतांनी विजय मिळेल.”
ते पुढे म्हणाले की, “मी अजित दादांच्या शेजारी मंत्रिमंडळात बसायचो. सुनेत्रा ताईंनी दादांच्या सावलीत काम केले आणि आज त्या बारामतीच्या माऊली आहेत. काँग्रेसने निवडणूक लढवू नये, ही जनभावना आहे. अजित दादांचा जीवन प्रवास काँग्रेससोबत गेलाय, त्यामुळे त्यांच्या विचारांचा आदर करावा.”
बावनकुळे यांनी काँग्रेसला नम्रपणे सांगितले की बारामतीत राजकारण संस्कार आणि संस्कृतीसह करावे, दादांची जागा वेगळी आहे, निवडणूक लढवू नये, आणि सुनेत्रा पवारांच्या पाठीमागे उभं रहावे.
या भाषणाने बारामतीत राजकीय वातावरण अधिक तणावपूर्ण बनवले असून, पोटनिवडणुकीस आधीच सत्तापक्ष आणि विरोधकांमध्ये थेट संघर्षाची पद्धत स्पष्ट झाली आहे.