कारंजा लाड,
Brother commits suicide, sister dies तालुक्यातील लोहगाव येथे अतिशय दुर्दैवी घटना घडली असून, एका दिवसाच्या अंतराने सख्ख्या भाऊ-बहिणीचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. दारूच्या व्यसनातून उद्भवलेल्या कौटुंबिक वादामुळे भावाने आत्महत्या केली, तर त्याच दुःखातून व आजारपणामुळे बहिणीचा हृदयविकाराने मृत्यू झाला. मृतांची नावे गोकुळ वामनराव राठोड (वय ४०) व गीता रामश्वर राठोड (वय ४५,) दोघेही रा. लोहगाव ता. कारंजा अशी आहेत. प्राप्त माहितीनुसार, गोकुळ राठोड यांना दारूचे व्यसन होते. या व्यसनामुळे त्यांच्या कुटुंबात वारंवार वाद होत असत. ४ एप्रिल रोजी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास दारूच्या कारणावरून पत्नीशी वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या गोकुळ राठोड यांनी घराजवळील मुंगणीच्या शेंगांच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेनंतर त्यांना तत्काळ कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून ५ एप्रिल रोजी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
याप्रकरणी कारंजा ग्रामीण पोलिसांनी हिराचंद चव्हाण रा. लोहगाव यांच्या फिर्यादीवरून आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, भावाच्या मृत्यूचे दुःख अजून ओसरले नसतानाच दुसर्याच दिवशी आणखी एक दुर्दैवी घटना घडली. गोकुळ राठोड यांच्या मोठ्या बहिणी गीता रामेश्वर राठोड यांना ५ एप्रिल रोजी रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्या यापूर्वीपासूनच गंभीर आजाराने त्रस्त होत्या. भावाच्या निधनाचा धक्का आणि प्रकृतीची बिघडलेली स्थिती यामुळे त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना बेशुद्ध अवस्थेत कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे कर्तव्यावरील डॉटरांनी त्यांना मृत घोषित केले. एका दिवसाच्या अंतराने सख्ख्या भाऊ-बहिणीचा मृत्यू झाल्याने लोहगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.