वाढत्या उष्णतेमुळे संत्रा बागांवर संकट

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
शेतकर्‍यांची शासनाकडे धाव
 
तिवसा,
Crisis in orange groves तिवसा तालुक्यात दिवसेंदिवस वाढणार्‍या तीव्र उष्णतेमुळे संत्रा उत्पादक शेतकर्‍यांवर अभूतपूर्व संकट ओढवले आहे. तापमानाचा पारा थेट ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने आंबिया बहारातील संत्रा बागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळती सुरू झाली आहे. झाडावरच फळे पिवळी पडणे, चट्टे येणे आणि गुणवत्तेत घसरण होणे अशा गंभीर समस्या निर्माण झाल्या असून, शेतकर्‍यांच्या मेहनतीवर पाणी फेरल्या जात आहे.
 
 
nivedan
 
तज्ञांच्या सल्ल्यानुसार झाडांना पुरेसे सुमारे १७० लिटर पाणी देऊनही अपेक्षित परिणाम दिसत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. मार्च महिन्याच्या मध्यापासूनच तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडला आणि त्यानंतर अचानक वाढ झाल्याने फळधारणेवर मोठा परिणाम झाला. ३५ अंशांपेक्षा जास्त तापमानात संत्रा फळांची गळ वाढते, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. यामागे केवळ उष्णतेचा नाही, तर बदलत्या हवामानाचा मोठा प्रभाव असल्याचेही स्पष्ट होत आहे. झपाट्याने होणारी वृक्षतोड, सिमेंट रस्त्यांचे वाढते जाळे, रासायनिक खतांचा अतिरेकी वापर आणि कीटकनाशकांचा बेसुमार वापर यामुळे पर्यावरणीय संतुलन ढासळले असून त्याचा थेट परिणाम संत्रा बागांवर दिसून येत आहे. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे फळधारणा कमी झाली असून, त्यातच वाढत्या तापमानामुळे उरलेली फळेही टिकवणे कठीण झाले आहे. एप्रिल महिन्यातच अशी भीषण स्थिती निर्माण झाल्याने पुढील काळाबाबत शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
 
 
Crisis in orange groves  या पृष्ठभूमीवर शेतकरी न्याय हक्क विचार मंच, शेंदूरजना खुर्द आणि एकजूट शेतकरी संघटना, कुर्‍हा यांच्या वतीने तिवसा तहसील कार्यालयात नायब तहसीलदार आशिष नागरे यांना निवेदन सादर करण्यात आले. संत्रा फळगळतीची गंभीर समस्या शासनाच्या निदर्शनास आणून देत तातडीने उपाययोजना व आर्थिक मदत देण्याची जोरदार मागणी करण्यात आली. निवेदन देताना अध्यक्ष दिनेश वानखडे यांच्यासह विनोद दारोकार, सतीश संभे, शैलेंद्र खारकर, श्रीकृष्ण बोरकर, निखिल तेटू, मधुकर तेटू, सुरेश सपाटे, नंदकिशोर जिरापुरे, रमेश वकालकार, महेश डांगे, महेश लांजेवार, संजय टेकाडे, सोपान जिरापुरे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.