रोमांचक अंतिम सामन्यात नागपूर ऑरेंज सिटी विजयी
यवतमाळ,
‘Dhyanchand Cup’ Hockey Tournament यवतमाळ पोलिस बॉईज संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित ‘ध्यानचंद चषक हॉकी स्पर्धा 2026’ चा समारोप अभ्यंकर कन्या शाळेच्या क्रीडांगणावर अत्यंत उत्साहपूर्ण आणि हॉकीमय वातावरणात पार पडला. क्रीडा रसिकांच्या प्रचंड गर्दीत पार पडलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना रेंज पोलिस, नागपूर आणि नागपूर ऑरेंज सिटी या दोन तगड्या संघांमध्ये झाला.
अत्यंत चुरशीच्या आणि रोमांचक अशा या सामन्यात नागपूर ऑरेंज सिटी संघाने आपला उत्कृष्ट खेळ करत नागपूर रेंज पोलिस संघाचा 3-0 अशा मोठ्या फरकाने पराभव करून ‘ध्यानचंद चषक 2026’ वर आपले नाव कोरले. विजेत्या नागपूर ऑरेंज सिटी संघाचे नेतृत्व कर्णधार मोहम्मद शादाब यांनी, तर उपविजेत्या नागपूर रेंज पोलिस संघाचे नेतृत्व कर्णधार अमोल खराबे यांनी केले. दोन्ही संघांनी क्रीडागुणांचे प्रदर्शन करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
‘Dhyanchand Cup’ Hockey Tournament पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून वुमन्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव रमेश मुनोत, सहसचिव मोहन गांधी, वेल्फेअर असोसिएशन तथा समाजसेवक अमन, नगरसेवक विजय राय, मुख्याध्यापक सुनीता दर्डा, जम्मू काश्मीरचे पोलिस उपअधिकारी डॉ. अमित पाली, वनीता संजय बोंडे, गायक जितेंद्र पाखरे, प्रदीप मेटेकर, गिरीराज गुप्ता हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना आकर्षक चषक आणि वैयक्तिक पारितोषिके प्रदान करण्यात आली. सूत्रसंचालन अविनाश जोशी यांनी, तर आभारप्रदर्शन पोलिस बॉईज संघटनेचे अध्यक्ष अतिक शेख यांनी केले.