शेतकर्यांचा संताप वाढला
दर्यापूर,
Disruption on Satbara website तालुक्यातील शेतकर्यांना सध्या सातबारा उतार्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ऑनलाईन प्रणालीमध्ये वारंवार ‘एरर’ येत असल्यामुळे सेतू केंद्राचा अक्षरश: बट्याबोळ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेतकर्यांना कर्ज भरणे तसेच नवीन पीक कर्ज घेण्यासाठी सातबारा उतारा अत्यावश्यक असल्याने या कागदपत्रासाठी त्यांची सेतू केंद्रांकडे मोठ्या प्रमाणात धावपळ सुरू आहे. मात्र, संकेतस्थळ नीट कार्यरत नसल्यामुळे तासन्तास प्रतीक्षा करूनही शेतकर्यांच्या हाती काहीच लागत नसल्याने त्यांचा संताप अनावर होत आहे.
Disruption on Satbara website सेतू केंद्र चालकांनाही या तांत्रिक बिघाडाचा मोठा फटका बसत असून, नागरिकांच्या रोषाला त्यांनाच सामोरे जावे लागत आहे. सर्व प्रक्रिया ऑनलाईन असली तरी सिस्टमच डाऊन असल्यामुळे काम करणे अशक्य झाले आहे, अशी प्रतिक्रिया दर्यापूरमधील सेतू चालकांनी व्यक्त केली. संबंधित महसूल व आयटी विभागाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन संकेतस्थळातील तांत्रिक त्रुटी दूर कराव्यात, तसेच सेतू केंद्रांवरील कामकाज सुरळीत करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे. ऑनलाईन सेवा नावालाच, प्रत्यक्षात मात्र शेतकर्यांची फरफट अशी संतप्त प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे.
शासनाने समस्या सोडवावी
-पीक कर्ज भरण्यासाठी शेतकर्यांना सातबारा हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज असून पीक कर्ज भरण्यासाठी तो आवश्यक आहे. मात्र सेतू केंद्रावरील नित्याच्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकर्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शासनाने ही समस्या तातडीने सोडवून शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी प्रतिक्रिया काँग्रेस तालुकाध्यक्ष सुधाकर भारसाकळे यांनी दिली.