पुरक योजनांवर मात्र कोट्यवधीचा खर्च
रवि नवलाखे
धारणी,
Gadga Project गडगा मध्यम या मूळ प्रकल्पाचे काम कंत्राटदार कंपनीने अर्ध्यावर सोडले असले तरी या प्रकल्पाला पुरक असलेल्या पाईपलाईन आदी अन्य प्रकल्पांवर कोट्यवधीचा खर्च केला जात आहे. जोपर्यंत मूळ प्रकल्पाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत हा खर्च व्यर्थ जाणार आहे. मेळघाटात हरितक्रांती घडून आणण्याच्या प्रमुख उद्देशाने गडगा मध्यम प्रकल्पाचे स्वप्न मेळघाटातील नेत्यांनी व शेतकर्यांनी बघितले होते. तब्बल दहा वर्षे प्रकल्पाचे काम रखडल्यानंतर पुन्हा काम प्रगतीपथावर आणून माजी आमदार राजकुमार पटेल यांनी प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून शेतकर्यांना सिंचन सुविधा बहाल करण्याबाबत निर्देश दिले होते. मात्र संबंधित कंत्राटदार कंपनी एफ. ए. कन्स्ट्रक्शनद्वारे प्रकल्पाचे मुख्य कामच अर्धवट सोडून दिल्या गेल्यामुळे गडगा मध्यम प्रकल्पाचे भविष्य धोक्यात आल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे.
तर दुसरीकडे याच गडगा मध्यम प्रकल्पाला अनुसरून शासनाकडून तब्बल ४२ गावांकरिता पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी याकरिता पुन्हा एकदा प्रकल्पाला कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला गेला आहे आणि त्याअनुषंगाने काम युद्ध स्तरावर सुरू आहे. यासोबतच सिंचनाकरिता जवळपास अर्ध्या तालुक्यामध्ये शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून भव्य अशी पाईपलाईन केली जात आहे. गडगा मध्यम प्रकल्पाच्या नावे एकीकडे सिंचन तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पाचे नवीन काम सुरू आहे. मुख्य गडगा प्रकल्प मात्र अर्धवट पडल्यामुळे या दोन्ही प्रकल्पाचे भविष्य काय, असा गंभीर प्रश्न सध्या उपस्थित केला जातो आहे.
Gadga Project गडगा मध्यम प्रकल्पाद्वारे ४२ गावांमधे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाणार आूल याकरिता युद्धस्तरावर फिल्टर प्लांट, विहिरी आणि पाण्याच्या भव्य टाक्यांचे आणि पाईपलाईनचे काम सुरु आहे. सूत्रांपासून मिळालेल्या माहितीनुसार सदर काम प्रीतिपालसिंह नागपूर या कंपनीकडून केले जात आहे. मात्र, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी कामाला प्रत्यक्ष भेट देऊन कामाच्या गुणवत्तेचा दर्जा तपासावा, अशी मागणी जनतेतून होत आहे. या पुरक प्रकल्पावर शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो आहे, तरी दुसरीकडे मात्र संबंधित प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या प्रकल्पाचे भविष्य फार चांगले दिसून येत नाही. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी कामाला भेट दिल्यानंतर संबंधित विभाग आणि कंत्राटदार कंपनीची मोठी पोलखोल होण्याची दाट शक्यता गडगा मध्यम प्रकल्पावर दिसून येत आहे.