आरोग्य उपकेंद्र सतत कुलूप बंद

आदिवासी बहुल गावातील नागरिकांची दैना

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
मानोरा,
Health sub-centre locked down तालुका हा आकांक्षीत वाशीम जिल्ह्यातील सर्व बाबतीत माघारलेला तालुका असून, या तालुयातील ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाकडून सुरू करण्यात आलेले उपकेंद्र केवळ या उपकेंद्रांसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचार्‍यांना मासिक वेतन देण्यापुरतेच आहे की काय ? असा सवाल सातत्याने कुलूप बंद अवस्थेत राहत असलेल्या हिवरा खुर्द येथील उपकेंद्राच्या इमारतीवरून पुढे येत आहे. हिवरा खुर्द ह्या गावातील लोकसंख्येपैकी पन्नास टक्के लोकसंख्या ही आदिवासी बांधवांची आहे. हिवरा येथील नागरिकांप्रमाणेच इंगलवाडी, मेंद्रा, वटफळ या गावांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव निवासाला असून आरोग्य विषयक कुठलीही आपत्कालीन घटना घडली तर हिवरासह उपरोक्त गावातील नागरिकांच्या प्रथमोपचारासाठी हिवरा खुर्द येथील उपकेंद्र सोईचे पडते.
 

washim 
 
 
येथे नेमणुकीला असलेल्या समुदाय आरोग्य अधिकारी आणि परिचारिका निवासाला तर नसतातच मात्र सेवेत सुद्धा गैरहजर राहत असल्याने आरोग्य उपकेंद्र सतत कुलबंद असते, ज्यामुळे किरकोळ आजार असो की गंभीर स्वरूपाचा आजारी त्यांना शेंदुर्जना, मानोरा अथवा वाशीम गाठण्याशिवाय पर्याय नसतो. हिवरा खुर्द सह आजूबाजूच्या गावातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सोयी सुविधा प्राप्त व्हाव्या यासाठी येथे नेमणुकीला असलेले समुदाय आरोग्य अधिकारी आणि परिचारिका यांना सेवा बजावण्या संदर्भात ताकीद द्यावी अशी तोंडी मागणी शेंदुर्जना येथे येथील आरोग्य अधिकार्‍यांना स्थानिक माजी सरपंच अनिल चव्हाण यांनी एक आठवड्यापूर्वी बोलूनही परिस्थितीत कुठलाच बदल पडलेला नसल्याचे कुलूप बंद आरोग्य केंद्रावरून निदर्शनास येत आहे.