नवी दिल्ली,
green-asha-ship : भारताचे एलपीजी वाहून नेणारे ‘ग्रीन आशा’ हे जहाज यशस्वीरित्या होर्मुझ सामुद्रधुनी पार करून सुरक्षित बाहेर आले आहे. या जहाजावर सुमारे २० हजार टन एलपीजीचा साठा असल्याची माहिती मिळाली आहे. रविवारी दुपारी भारतीय वेळेनुसार साडेतीनच्या सुमारास हे जहाज इराणच्या लारक, केशम आणि होर्मुझ बेटांदरम्यान असलेल्या जलक्षेत्रातून मार्गक्रमण करत सामुद्रधुनीच्या पूर्व भागात पोहोचले.
पश्चिम आशियातील संघर्ष सुरू झाल्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनी पार करणारे हे आठवे भारतीय जहाज ठरले आहे. यापूर्वी ‘ग्रीन सांवरी’ या जहाजानेही मोठ्या प्रमाणात एलपीजी वाहून सुरक्षित प्रवास पूर्ण केला होता. या पार्श्वभूमीवर भारतीय जहाजांच्या सुरक्षेसाठी नौदलाची युद्धनौका सज्ज ठेवण्यात आली असून केंद्र सरकारही इराणशी सातत्याने संपर्क ठेवत आहे.
सध्या फारसी आखातात अनेक भारतीय जहाजे आणि शेकडो खलाशी कार्यरत असून त्यांच्या सुरक्षेवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. आतापर्यंत मोठ्या संख्येने खलाशांना सुरक्षितपणे भारतात परत आणण्यात आले आहे. या संपूर्ण परिस्थितीत भारताने समुद्री वाहतूक सुरळीत ठेवत आपल्या नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.