पाकिस्तानकडून आलेल्या शांतता प्रस्तावाला इराणने दिला डिच्चू

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
तेहरान,
pakistan-peace-proposal : मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने मांडलेल्या युद्धविरामाच्या प्रस्तावाला इराणने स्पष्ट नकार दिला आहे. पाकिस्तानने १५ मुद्द्यांचा शांतता प्रस्ताव तयार करून तो इराण आणि अमेरिकेला पाठवला होता. या प्रस्तावात ४५ दिवसांचा युद्धविराम आणि होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, इराणने हा प्रस्ताव आपल्या राष्ट्रीय हितांना योग्य नसल्याचे सांगत फेटाळून लावला.
 
 
war
 
 
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बगाई यांनी सांगितले की, कोणतीही चर्चा ही देशाच्या हितावर आधारित असली पाहिजे आणि दबावाखाली इराण कोणताही निर्णय घेणार नाही. त्यांनी स्पष्ट केले की, इराणने आपली भूमिका आधीच मांडली असून त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
 
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही आक्रमक भूमिका घेत इराणला इशारा दिला आहे. त्यांनी इराणमधील काही महत्त्वाच्या ठिकाणांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली असून, अमेरिका-इराण चर्चेबाबतही संकेत दिले आहेत. या सर्व घडामोडींमुळे मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, परिस्थिती कधीही बदलू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे.