पेडगावात जलजीवन मिशनची कामे अर्धवट

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
मंगरुळनाथ, 
Jaljeevan Mission work in Pedgaon तालुक्यातील पेडगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचे चित्र समोर आले आहे. शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत गावात दोन विहिरी, दोन बोअरवेल, पाण्याची उंच टाकी तसेच संपूर्ण गावभर पाइपलाइनचे जाळे उभारण्यात आले आहे. मात्र इतकी सर्व कामे पूर्ण झाल्याचे दाखवूनही प्रत्यक्षात ग्रामस्थांना आजतागायत एक थेंबही पाणी मिळालेले नाही. गावातील पाण्याची टाकी सध्या केवळ शोभेची वस्तू ठरत असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मागील १५ ते २० वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करणार्‍या पेडगावकरांना या योजनेमुळे मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात योजना कागदावरच पूर्ण झाल्याचे चित्र दिसत असून, ग्रामस्थांच्या आशा पुन्हा एकदा मातीमोल ठरल्या आहेत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावात उभारण्यात आलेल्या दोन बोअरवेल, दोन विहिरी व पाईपलाइन असूनही पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली नाही. काही ठिकाणी पाईपलाइन अर्धवट आहे, तर काही ठिकाणी जोडणीच केलेली नाही. त्यामुळे संपूर्ण योजनेचा उपयोग होत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.
 
 
water
 
 
दरम्यान, महिलांना व नागरिकांना आजही दररोज लांब अंतरावरून पाणी आणावे लागत असून, यामुळे त्यांचा वेळ, श्रम आणि आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिकच तीव्र झाली असून, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच याचा त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित अधिकार्‍यांकडे तसेच लोकप्रतिनिधी‡खासदार व आमदार‡यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कामे केवळ कागदावर पूर्ण दाखवून शासनाची दिशाभूल केली जात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात येत आहे. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करून नियमित व सुरळीत पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा. अन्यथा ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आाला आहे.