Karanjkhed: Water filter एकीकडे सरकार ‘हर घर जल’च्या घोषणा देत असताना, दुसरीकडे महागाव तालुक्यातील करंजखेड ग्रामपंचायतने जनतेच्या आरोग्याला वाèयावर सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाखो रुपये खर्चून बसवलेले वॉटर फिल्टर गेल्या सहा-सात महिन्यांपासून बंद अवस्थेत असून, शुद्ध पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकंती करावी लागत आहे. विशेष म्हणजे, प्रत्यक्षात कोणतीही दुरुस्ती न करता फिल्टर दुरुस्तीच्या नावाखाली 2 लाख रुपयांचा निधी हडपल्याचा खळबळजनक आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
(संग्रहित छायाचित्र )
पूस नदीकाठावर वसलेल्या करंजखेडचे पाणी भीषण प्रदूषित झाले आहे. विहिरीच्या पाण्याचा टीडीएस चक्क 750 ते 800 पर्यंत पोहोचला आहे. हे विषारी पाणी प्यायल्यामुळे गावातील घराघरांत मूतखड्याचे रुग्ण आढळत असून, काहींच्या किडनीवर गंभीर परिणाम झाला आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे गावकरी मृत्यूच्या छायेत वावरत आहेत.
Karanjkhed: Water filter करंजखेड जुने आणि करंजखेड नवीन अशा दोन्ही ठिकाणी बसवलेले फिल्टर यंत्र मागील अनेक महिन्यांपासून धूळ खात पडले आहेत. ग्रामसभेत ग्रामसेवक केंद्रे यांनी फिल्टर दुरुस्तीवर 2 लाख रुपये खर्च झाल्याचे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात फिल्टरची एक नळीही बदलली नसल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. हा सर्व पैसा कुणाच्या खिशात गेला, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे वॉटर फिल्टर आणि नळ योजनेच्या भ्रष्टाचाराची स्वतंत्र चौकशी व्हावी, कामांचे अंदाजपत्रक आणि प्रत्यक्ष खर्च यांचे ‘स्पेशल ऑडिट’ करण्यात यावे, चौकशी पूर्ण होईपर्यंत ग्रामपंचायतीचा सर्व शासकीय निधी तत्काळ स्थगित करावा, दोषी सरपंच, ग्रामसेवक आणि संबंधित अधिकाèयांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली. यावेळी निवेदन देताना उबाठा शिवसेना विधानसभा प्रमुख भीमराव भालेराव, अॅड. लक्ष्मीकांत भांगे, गणेश भांगे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. आता जिल्हा परिषद प्रशासन या ‘कागदी’ घोटाळेबाजांवर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘कागदी’ विकासाचा सुळसुळाट
केवळ करंजखेडच नव्हे, तर महागाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये सरपंच आणि ग्रामसेवकांच्या संगनमताने कोट्यवधींची कामे केवळ कागदावरच झाल्याची चर्चा आहे. करंजखेडच्या या लढ्यामुळे आता तालुक्यातील इतर गावांमधील भ्रष्टाचाराचे वाभाडे निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.