केरोसिन तात्पूरता नको; दिर्घकालिन द्या !

- तात्पूरता केरोसिन उचल करण्यास हॉकर्स/रिटेलर्सचा नकार - केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांसह मुख्यमंत्री व अन्न पुरवठा मंत्र्यांना निवेदन

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
गोंदिया,
kerosene-distribution : एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून शासनाने तात्पुरत्या स्वरूपात केरोसिन वाटपाचा निर्णय घेतला आहे. यानुसार जुन्या केरोसिन विक्रेत्यांकडे वाटपाची जबाबदारी दिली जाणार आहे. मात्र, तात्पूरता केरोसिनची कुणीही उचल करणार नसल्याचा निर्णय केरोसिन हॉकर्स/रिटेलर्स फेडरेशनने घेतला असून दिर्घकालीन केरोसिन वाटप सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. तसे निवदेनही राज्यभरातून केंद्र व शासनाला पाठविण्यात आले आहे. त्यामुळे इंधन पुरवठ्याच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
 
 
gond
 
 
 
अखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे इंधन तुटवडा निर्माण झाला आहे. यावर राज्यात तात्पूरता केरोसिन वाटप करण्यात येणार आहे. यासाठी जुन्या केरोसिन विके्रत्यांकडे ही जबाबदारी देण्यात येणार आहे. मात्र, केरोसिन हॉकर्स/रिटेलर्स फेडरेशनतर्फे शासनाच्या या निर्णयाला नकार देण्यात आला आहे. फेडरेशनच्या मते राज्यात केरोसिन वाटपाला बंद झाल्याने राज्यातील ६५ हजार केरोसिन विक्रेते बेरोजगार झाले असून विक्रेत्यांना मानधन देण्याबाबतचे उच्च न्यायालयाचे ६ जुलै २०२२ चे आदेश आहे. मात्र शासनाकडून अद्यापही केरोसिन विक्रेत्यांना मानधन देण्यात आलेले नाही. त्यात गेल्या ७ ते ८ वर्षांपासून केरोसिन वाटपाचे काम बंद असल्याने त्यांच्या जवळील वाहन व इतर साहित्य भंगार झाले आहे. सदर साहित्य किंवा वाहन नव्याने तयार करण्यासाठी १० ते १५ हजार रुपयांचा खर्च येणार आहे. तेव्हा केरोसिन विक्रेत्यांना २० हजार रुपये मासिक मानधन देण्यात यावे किंवा तात्पूरत्या स्वरूपात केरोसिनचे वाटप न करताना दिर्घकालिन करण्यात यावे. अशी मागणी फेडरेशनच्या वतीने करण्यात आली आहे. तोपर्यंत राज्यात कुणीही केरोसिनची उचल करणार नाही असा निर्णयही संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे.
 
 
केरोसिन हे जीवनावश्यक वस्तू असून आमचा परंपरागत ६० वर्षांपासूनचा व्यवसाय कुण्या एका व्यक्तीच्या याचिकेमुळे बंद करण्यात आला. त्यामुळे गेल्या ७ ते ८ वर्षांपासून आमचा व्यवसाय बंद आहे. त्यात आता गरज पडल्यावर केवळ तात्पूरत्या स्वरूपात केरोसिन वाटपाचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. हे आम्हाला मान्य नसून दिर्घकालिन केरोसिन वाटप किंवा मानधन देण्यात यावे. अशी आमची मागणी असून शासनाला संपूर्ण राज्यभरातून स्थानिक तहसीलदारांच्या मार्फत निवेदन पाठविण्यात आले आहे.
- बाबुराव मेश्राम
राज्याध्यक्ष, केरोसिन हॉकर्स/रिटेलर्स फेडरेशन, महाराष्ट्र राज्य