गावोगावी गॅस गाड्या बंद; महिलांचा संताप, सिलेंडरसाठी ३० किलोमीटरपर्यंत फेरफटका

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
अवसरी (पुणे),
LPG Gas Crisis : आंबेगाव तालुक्यातील कळंब येथील साक्षी एचपी गॅस एजन्सीच्या गावोगावी फिरणाऱ्या गॅस गाड्या गेल्या महिनाभरापासून बंद असल्यामुळे ग्राहक, विशेषतः महिला, संतप्त आहेत. गॅस मिळवण्यासाठी नागरिकांना २५ ते ३० किलोमीटर अंतर प्रवास करावा लागतो, आणि अनेकदा जीव धोक्यात घालून सिलिंडर घेण्यास भाग पडतो.
 
 
pune
 
 
तालुक्यातील मंचर, अवसरी, निरगुडसर, पारगाव, लोणी, धामणी, मेंगडेवाडी, गावडेवाडी यासह अनेक गावांमध्ये सिलिंडर मिळवण्यास त्रास होत आहे. ग्राहकांच्या तक्रारींनुसार, सिलिंडर वाटप सकाळी ६ ते ९ वाजता होते, आणि वेळेत पोहोचले नाही तर रिकामा टाकी घेऊन परत यावे लागते. एक सिलिंडर मिळवण्यासाठी ३०० रुपयांपर्यंत खर्च येत असल्याची तक्रारही केली गेली आहे.
 
तालुका पुरवठा अधिकारी माधुरी संतोषवार यांनी सांगितले की, संबंधित एजन्सीला सोमवारपासून गावोगावी गॅस गाडी पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सुधारणा न झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, तसेच कळंब येथील पहाटे होणारे सिलिंडर वाटप बंद करण्याबाबतही सूचना दिल्या जाणार आहेत. तहसीलदार डॉ. सचिन वाघ म्हणाले की, तालुक्यातील १९ हजार गॅस ग्राहकांसाठी दररोज सुमारे ६०० ते ७०० सिलिंडर पुरवठा करणे आवश्यक आहे, परंतु मागील महिनाभरात फक्त ३५० सिलिंडरचं वितरण होत आहे.
 
गॅस एजन्सीचे प्रतिनिधी बाळशीराम भालेराव म्हणाले, “अमेरिका, इस्त्राईल आणि इराणमधील युद्धामुळे मागील एक महिन्यापासून पुरवठा कमी झाला आहे. मंगळवारपासून भरलेले सिलिंडर उपलब्ध होतील आणि गावोगावी टेम्पो पाठवण्याचे नियोजन केले गेले आहे.”
ग्राहक आणि महिलांचा संताप वाढत आहे, आणि त्यांनी एजन्सीकडून तातडीने गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.