अनिल कांबळे
नागपूर,
Nagpur News अभ्यास करण्यावरून दाेन्ही मुलांना आईने रागावले. त्यानंतर दाेन्ही मुलांनी घरातून पलायन केले. ही घटना शनिवारी सायंकाळी प्रतापनगरात घडली. आदी आणि प्रथम अशी घरातून पलायन केलेल्या मुलांची नावे आहे. या मुलांचे वडील परिसरात खासगी काम करतात. तर आई त्रिमूर्ती नगरात दत्तमंदिर भागातील भवन शाळेजवळ घरकामे करतात. आदी आणि प्रथम ही त्यांची दाेन्ही मुले प्रतापनगर पाेलिस हद्दीतील एका शाळेत शिकतात. ही भावंडे अभ्यासात लक्ष घालत नसल्याने आई या मुलांच्या काळजीपाेटी अभ्यास करण्यास सांगत हाेती.

मुलांना अभ्यासाला बसा असे सांगून त्या शनिवारी दुपारी कामावर गेल्या. सायंकाळी कामावरून घरी आल्यानंतर त्यांनी बराच वेळ वाट पाहिली. शेजारी विचारले असता, सायंकाळी सायकलवर निघून गेल्याचे कळल्याने मुले खेळायला गेली असावित म्हणून त्यांनी पुन्हा काही वेळ वाट पाहिली. Nagpur News रात्रीचे ८:३० वाजले तरी मुले घरी आली नसल्याचे चिंतेत आलेली आई यांनी प्रतापनगर पाेलिस ठाणे गाठले. गिट्टीखदानमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रतापनगर पाेलिसांनी गांभीर्य ओळखत तातडीने तपास पथकाला सतर्क केले. पथकाने परिसर पिंजून काढत सीसीटीव्ही फुटेजही तपासणे सुरू केले आहे. ज्या ठिकाणावरून मुले सायकवरून जाताना दिसली त्या बाजूच्या सर्व दिशांना पाेलिस मुलांचा शाेध घेत आहेत.