इराण-अमेरिका संघर्षाचा नेपाळला फटका

कार्यालये आता पाचच दिवस सुरू राहणार

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
काठमांडू,
Nepal hit by Iran-US conflict पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाचा परिणाम आता हिमालयीन देश नेपाळवरही स्पष्टपणे दिसू लागला आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईने नेपाळची अर्थव्यवस्था आणि दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारला काही कठोर निर्णय घ्यावे लागले आहेत. नवनियुक्त पंतप्रधान बालेन शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आठवड्यातील कामकाजाच्या पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार, सरकारी कार्यालये आणि शैक्षणिक संस्था आता आठवड्यातून दोन दिवस बंद राहतील. पूर्वी फक्त शनिवारी सुट्टी असायची; मात्र आता रविवारीही सुट्टी देण्यात आली असून, पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू करण्यात आला आहे. या निर्णयामागील प्रमुख उद्देश म्हणजे इंधनाचा वापर मर्यादित ठेवणे.
 
 

Nepal pm 
 
राजधानी काठमांडूसह देशभरात इंधन पुरवठा विस्कळीत झाल्याने प्रशासनावर मोठा ताण निर्माण झाला आहे. सरकारी प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही नवीन व्यवस्था तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली असून कार्यालयीन वेळाही निश्चित करण्यात आली आहे. सध्याच्या संकटात इंधनाची बचत करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. नेपाळची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर आयातीत इंधनावर अवलंबून आहे, विशेषतः भारतकडून होणाऱ्या पुरवठ्यावर. जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या अडचणींचा थेट फटका नेपाळला बसत असून, सरकारी इंधन पुरवठा संस्थेला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. इंधनाच्या किमती वाढल्यामुळे वाहतूक खर्च वाढला असून त्याचा परिणाम विमान प्रवास आणि पर्यटन क्षेत्रावरही झाला आहे. पर्यटन हा नेपाळच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असल्याने ही परिस्थिती अधिकच चिंताजनक ठरत आहे.