वर्धा,
kirit somaiya एसआयआर लागू झाल्यापासून जुन्या सर्व मतदार याद्या निवडणूक आयोगाच्या आदेशाने रद्द होणार असून प्रत्येकाला आपले नाव नव्याने मतदार यादीत समाविष्ट करावे लागणार आहे. भाजपाच्या बूथवरील कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील प्रत्येक घरात जाऊन या प्रक्रियेची माहिती जनतेपर्यंत पोहचवून जनजागरण करावे. शासनातर्फे दिलेल्या बीएलओ सोबत संपर्क करून निर्दोष मतदार यादी बनविण्याच्या विधायक कार्यात सहभाग नोंदवावा. एकही मतदार मतदार यादीत नाव येण्यापासून वंचित राहता कामा नये, असे आवाहन महाराष्ट्र भाजपा एसआयआर संयोजक माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केले.
रविवार ५ रोजी भाजपा वर्धा विधानसभा तर्फे मतदार यादी पुनरावलोकन (एसआयआर) कार्यशाळा स्थानिक हरिराम टॉवर येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार रामदास तडस, भाजपा ज़िल्हाध्यक्ष संजय गाते, माजी खासदार सुरेश वाघमारे, शहर अध्यक्ष निलेश किटे उपस्थित होते.
देशातील सर्व राज्यात एसआयआर प्रक्रिया केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनात राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्यात ११ राज्यात ही प्रक्रिया यशस्वी पार पडली असून दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. दुसर्या टप्प्यात महाराष्ट्रात ही प्रक्रिया प्रभावीपणे राबवण्याचे उद्दिष्ट असून भाजपा आपल्या कार्यकर्त्यांना त्यासाठी बीएलए २ चे प्रशिक्षण देत आहे. याच पृष्ठभूमीवर माजी खा. किरीट सोमय्या रविवारी वर्धा दौर्यावर आले असता वर्धा विधानसभेतील ३४६ बूथवरील बीएलए २ची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. याआधी झालेल्या एसआयआर नंतर २००२ साली ज्यांची नावे मतदार यादीत होती त्यांना बीएलओ तर्फे संपूर्ण तपशील भरलेला फॉर्म घरी आणून दिल्या जाणार आहे. त्यावर आपला फोटो लावून आणि सही करून तो फॉर्म बीएलओकडे सुपूर्द केल्यास आपले नाव मतदार यादीत समाविष्ट होईल.kirit somaiya ज्यांचे नाव २००२ च्या मतदार यादीत नसेल किंवा जे मतदार २००२ नंतर १८ वर्षे पूर्ण केलेले असतील त्यांनी बीएलओकडे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करून घ्यायचे आहे. मतदार यादीचे सखोल पुनरावलोकन करणे व निर्दोष मतदार यादी बनविणे हा या अभियानाचा उद्देश असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले.
प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी केले. संचालन वर्धा विधानसभा प्रमुख व भाजपाचे एसआयआर अभियान बीएलए १ निलेश पोहेकर यांनी केले. यावेळी वर्धा विधानसभेतील वर्धा शहर, सावंगी, पवनार आणि सेलू मंडळातील बीएलए २ प्रशिक्षार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.