बुलढाणा,
marijuana-seized-in-motala : मोताळा येथील कॉटन मार्केट परिसरात पोलिसांनी धाड टाकून सुमारे १० किलो गांजा जप्त केला असून, जवळपास दोन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून बोराखेडी पोलिसांनी रविवारी (५ एप्रिल) दुपारी चारच्या सुमारास ही कारवाई केली.
कॉटन मार्केट परिसरात राहणारा अजय रोहिदास मोहिते (वय २१) हा विक्रीसाठी घरात गांजा साठवून ठेवल्याची गुप्त माहिती पीएसआय राजेंद्र कपले यांना मिळाली. त्यांनी ही माहिती ठाणेदार सीताराम मेहेत्रे यांना कळविल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ पथक तयार करण्यात आले. या पथकात सपोनि बालाजी शेंगेपल्लु, पीएसआय राजेंद्र कपले, पोहेकॉ नंदकिशोर धांडे, अमोल खराडे, सुपडासिंग चव्हाण, विजय सुरडकर, मनोहर पंडीत, महिला पोहेकॉ अनिता मोरे, पोकॉ प्रमोद साळोक, रविंद्र नरोटे, महिला पोकों आकांशा जन्हाड यांचा समावेश होता. पंचांसमक्ष अजय मोहिते यांच्या घरावर छापा टाकण्यात आला.
या छाप्यात घरातून ९ किलो ८०० ग्रॅम गांजा, अंदाजे १ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी गांजा जप्त करून अजय मोहिते याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पीएसआय राजेंद्र कपले यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि बालाजी शेंगेपल्लु व पोकों सचीन चव्हाण करीत आहेत. कॉटन मार्केट परिसरात गेल्या सहा महिन्यातील गांजा प्रकरणी ही तिसरी कारवाई असल्याची माहिती मिळाली.