अंमलबजावणीसंदर्भात आपत्कालीन बैठक
नागपूर,
PNG in time for industries हिंगणा एमआयडीसीतील अनेक उद्योग एलपीजीवर अवलंबून असल्याने समस्यांचा सामना करावा लागत आहे. या परिसरात पाइप्ड नॅचरल गॅस पाइपलाइनचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने करण्यात आली. पीएनजीची वेळेत आणि सुरळीत अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयाने कार्य करण्याचे आश्वासन बैठकीत देण्यात आले.
एमआयडीसी क्षेत्रातील औद्योगिक युनिट्सना देण्यात आलेल्या पूर्वसूचनेच्या अनुषंगाने तसेच महाराष्ट्र शासनाच्या गॅस डिस्ट्रीब्युशन नेटवर्कच्या अंमलबजावणीसंदर्भातील निर्देशांनुसार, एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनची उद्योग भवन येथे आपत्कालीन बैठक घेण्यात आली. या बैठकीत एमआयएचे अध्यक्ष पी. मोहन यांच्या नेतृत्वात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. या बैठकीला एमआयएचे उपाध्यक्ष गणेश जायसवाल, सचिव अरुण लांजेवार तसेच एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी मनोहर पोटे, कार्यकारी अभियंता विठ्ठल राठोड, हरियाणा सिटी प्रा. लि. चे अधिकारी उपस्थित होते.
औद्योगिक कामकाजावर परिणाम
एलपीजीवर अवलंबून असलेल्या उद्योगांना भेडसावणार्या गंभीर अडचणींबाबत एमआयएने माहिती दिली. जागतिक पुरवठ्यातील अडचणींमुळे औद्योगिक कामकाजावर मोठा परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले. एमआयडीसी परिसरात पाइप्ड नॅचरल गॅस पाइपलाइनचे काम तातडीने गतीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.
पीएनजी कनेक्टिव्हिटी पूर्ण करणे
PNG in time for industries एमआयएने शासनाच्या अलीकडील निर्देशानुसार ३० जून २०२६ पर्यंत पीएनजी कनेक्टिव्हिटी पूर्ण करणे अनिवार्य असल्याचेही संबंधित अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिले. यासाठी अध्यक्ष पी. मोहन यांनी डिस्ट्रिक्ट रेग्युलेटरी फॅसिलिटी उभारण्यासाठी किमान २० मीटर बाय २० मीटर जागा उपलब्ध करून देण्याची विनंती केली. यावर प्रादेशिक अधिकार्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने अर्ज सादर निर्देश दिले.
पीएनजी कनेक्शनसाठी करार करण्याचे आवाहन
सध्या एचसीजी कडून हिंगणा सहित प्रमुख औद्योगिक भागांमध्ये पाइपलाइन उभारणीचे काम सुरू असून, या परिसरात एलपीजीची मागणी सुमारे ५० ते—७५ मेट्रिक टन आहे. दरम्यान,एचसीजी ने सर्व उद्योगांना पीएनजी कनेक्शनसाठी लवकरात लवकर करार करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून प्रक्रिया वेगाने पूर्ण होईल. तसेच गरजेसाठी कॅस्केड सिस्टमद्वारे गॅस पुरवठा करण्याचीही हमी देण्यात आली आहे.