बारामती,
Political upheaval in Baramati बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत आज एक महत्त्वाची आणि अनपेक्षित राजकीय घटना समोर आली आहे. महायुतीकडून बारामतीत निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू असतानाही, काँग्रेससह काही उमेदवार रिंगणात उतरले आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, असे ठरल्यापूर्वीच बारामतीत राजकीय हालचालींनी गाजले. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच महायुतीच्या नेत्यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीला मान्यता दिली आणि थेट सुनेत्रा पवार यांना पाठिंबा जाहीर केला. हाके यांच्या माघारीमुळे बारामतीमधील निवडणूक आता मुख्यत्वे सुनेत्रा पवार विरुद्ध काँग्रेसचे आकाश मोरे अशी रंगणार आहे.

लक्ष्मण हाके हे आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बारामतीत दाखल झाले होते, परंतु त्यांच्या एन्ट्रीने महायुतीत हालचालींना वेग आला. माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी तातडीने हाके यांची भेट घेत 'फिल्डिंग' केली आणि अजितदादांच्या निधनानंतरच्या भावनिक परिस्थिती व मतदारसंघाच्या विकासाची गरज लक्षात घेऊन निवडणूक बिनविरोध व्हावी किंवा किमान महायुतीला पाठिंबा मिळावा, यासाठी हाके यांची मनधरणी केली. याच दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी लक्ष्मण हाके यांच्याशी फोनवरून संवाद साधला. हाके यांनी सांगितले की, सुनेत्रा ताई, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, उदय सामंत, धनंजय मुंडे आणि दत्ता भरणे या सर्व वरिष्ठ नेत्यांनी माझ्याशी संवाद साधला. इतके वरिष्ठ नेते जर आपल्याला फोन करत असतील, तर आपण नक्कीच विचार करायला हवा. याच विचारांमुळे हाके यांनी निवडणुकीतून माघार घेतली.