‘गोंडवाना मॉडेल’ पुस्तकांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
गडचिरोली, 
Publication of ‘Gondwana Model’ books गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि वनव्याप्त भागात गोंडवाना विद्यापीठाने राबविलेले नाविन्यपूर्ण शैक्षणिक व सामाजिक उपक्रम आता संपूर्ण राज्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहेत. नागपूरच्या व्ही. एन. आय. टी. येथे झालेल्या ‘ज्ञान सभा’ विकसित महाराष्ट्रासाठी शिक्षण या राष्ट्रीय संमेलनामध्ये, नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘गोंडवाना मॉडेल: बेस्ट प्रॅक्टिसेस ऑफ गोंडवाना युनिव्हर्सिटी’ या विषयावरील दोन महत्त्वपूर्ण पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्याला शिक्षण, प्रशासन आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये शिक्षा संस्कृती उत्थान न्यासचे राष्ट्रीय सचिव अतुल कोठारी, राज्यपालांचे सचिव विजयकुमार नारनवरे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, व्ही. एन. आय. टी. चे संचालक डॉ. प्रेमलाल पटेल आणि आय. आय. एम. नागपूरचे संचालक प्रा. भीमराया मैत्री आदी उपस्थित होते.
 
 
cg67678
 
 
विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाद्वारे प्रकाशित या ग्रंथांचे संपादन आय.क्यू.ए.सी. संचालक प्रा. धनराज पाटील यांनी केले आहे. यामध्ये एक ‘कॉफी टेबल बुक’ आणि एका ‘संपादित पुस्तकाचा’ समावेश आहे. कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या दूरगामी मार्गदर्शनाखाली विद्यापीठाने राबविलेल्या 13 अद्वितीय ‘बेस्ट प्रॅक्टिसेस’ चा (सर्वोत्कृष्ट उपक्रम) लेखाजोखा या पुस्तकांमध्ये मांडला आहे. यात प्रामुख्याने एकल ग्रामसभा सक्षमीकरण कार्यक्रम : स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी देण्यासाठी, युनिव्हर्सिटी एट व्हिलेज : उच्च शिक्षण थेट गावांपर्यंत पोहोचवण्यासाठी, स्पार्क : व्यसन निर्मूलन शिक्षा पदवी आदींचा समावेश आहे. या पुस्तकांच्या प्रकाशनासाठी कार्यक्रम अधिकारी स्वप्नील गिराडे, सहाय्यक प्रा. डॉ. मनीष देशपांडे आणि गंधर्व पिल्लारे या टीमने परिश्रम घेतले. संपादक प्रा. धनराज पाटील यांनी या प्रकल्पाच्या यशाबद्दल कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण आणि वित्त व लेखा अधिकारी भास्कर पठारे तसेच सर्व प्रकरण लेखक आणि समन्वयांचे विशेष आभार मानले.
  
 
गोंडवाना विद्यापीठ हे केवळ पदव्या देणारे केंद्र न राहता सामाजिक परिवर्तनाचे साधन बनावे, हा आमचा मानस आहे. ‘गोंडवाना मॉडेल’ मधील 13 उपक्रम हे स्थानिक समस्यांवर शैक्षणिक आणि संशोधनात्मक उपाय शोधण्याचे फलित आहेत. हे पुस्तक या सर्व प्रयत्नांचा दस्तऐवज असून, ग्रामीण विकासासाठी हे मॉडेल देशभर प्रेरणादायी ठरेल, असा मला विश्‍वास आहे.
प्रा. प्रशांत बोकारे, कुलगुरू
गोंडवाना विद्यापीठ