वॉशिंग्टन,
Shooting in the White House area व्हाईट हाऊस परिसरात गोळीबाराची घटना घडल्याने अमेरिकेतील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राजधानी वॉशिंग्टन डी.सी. मधील अतिसंवेदनशील भाग मानल्या जाणाऱ्या लाफायेट उद्यानाजवळ ही घटना घडली. सुदैवाने या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र हल्लेखोर अद्यापही सापडलेला नाही.
घटनेनंतर राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी जबाबदार असलेल्या युनायटेड स्टेट्स सिक्रेट सर्व्हिसने तात्काळ तपास सुरू करत परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. संशयित व्यक्ती आणि त्याच्या वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि इतर यंत्रणा संयुक्तपणे प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे, या घटनेच्या वेळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आठवड्याच्या शेवटी व्हाईट हाऊसमध्येच उपस्थित होते, त्यामुळे हा प्रकार अधिक संवेदनशील मानला जात आहे.
गेल्या काही दिवसांत अमेरिकेत अशा प्रकारच्या सुरक्षाविषयक घटना वाढल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी फ्लोरिडामध्ये संशयास्पद विमान आढळल्याने लढाऊ विमानांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर अज्ञात मानवरहित यंत्रे लष्करी तळांवर घिरट्या घालत असल्याचेही निदर्शनास आले होते. या तळांवर अनेक उच्चपदस्थ अधिकारी वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली होती.