गडचिराेली,
srpf-recruits-physical-test : भारत राखीव बटालियन-४ अंतर्गत राज्य राखीव पोलिस बल गट क्र. १७, चंद्रपूर येथील आस्थापनेवरील सशस्त्र पोलिस शिपाई संवर्गातील २४४ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. राज्य राखीव पोलिस बल गट क्र. १३, विसोरा, ता. (देसाईगंज) येथील कवायत मैदानावर ३१ मार्चपासून शारीरिक चाचणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान शारीरीक चाचणीत धावत असताना अचानक पडल्याने एका युवकाचा मृत्यु झाल्याची घटना ६ एप्रिल राेजी साेमवारला सकाळी ८. ३० वाजताच्या सुमारास घडली. आशिष भास्कर म्हशाखेत्री (२८) रा. देलाेडा बुज.ता. आरमाेरी असे मृतक युवकाचे नाव आहे.

विसाेरा येथील एसआरपीएफच्या कवायत मैदानावर ३१ मार्च पासून शारीरिक चाचणीला सुरुवात झाली असून १० एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. दररोज जवळपास १००० उमेदवारांची चाचणी घेतली जात आहे. भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची उपस्थिती पहाटे २ वाजतापासूनच दिसून येत असून रात्रीपासूनच हजारो युवक कवायत मैदानावर दाखल होत आहेत. त्यामुळे परिसरात मोठी गर्दी होत आहे. संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली पार पडत असून प्रत्येक टप्प्यावर काटेकोर नियंत्रण ठेवले जात आहे.
उन्हाचा त्रास टाळण्यासाठी शारीरिक चाचणी पहाटे ४ ते सकाळी ९ या वेळेत घेतली जात आहे. दरम्यान देलाेडा येथील युवक आशिष म्हशाखेत्री शारीरीक चाचणीसाठी पहाटेला विसाेरा येथील कवायत मैदानावर हजर झाला. सीआरपीएफचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ताे धावला. धावत असताना शेवटच्या क्षणी धावपट्टीच्या सीमारेषेवर आशिष अचानक पडला. ताे शुध्दीवर हाेता, मात्र त्याला नेमके काय हाेतय, हे स्पष्ट उपस्थित डाॅक्टर व सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांना सांगता आले नाही. लागलीच आशिषला देसाईगंज येथील ग्रामिण रूग्णालयात भरती करण्यात आले. उपचार सुरू असतानाच १० ते १५ मिनिटांत आशिषची प्राणज्याेत मालवली. या घटनेची नाेंद देसाईगंज पाेलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.