पुणे,
sunil-tatkare : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे भावनिक झाले आणि विरोधकांना चेतावणी देत सुनेत्रा पवार यांचा विजय अजित पवारांना श्रद्धांजली असेल, असा संदेश दिला.
तटकरे म्हणाले की, “माझ्या राजकीय आयुष्यातील सर्वात जास्त काळ मी अजितदादांसोबत घालवला आहे. सर्वच पक्षांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी माझी विनंती आहे. अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी सुनेत्रा पवार यांना विधानसभेत निवडून द्यावे, हीच सगळ्यांसाठी मागणी आहे.”
ते पुढे म्हणाले, “जर बिनविरोध निवडणूक शक्य नसेल, तर शप्पथ सांगतो की सुनेत्रा वहिनी सर्वाधिक मतांनी विजयी व्हाव्यात. बाबासाहेबांनी लोकशाहीची व्यवस्था दिली आहे आणि आपण त्याचे पालन करुया. हेच अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल.”
तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांना एक विशेष विनंती केली की, “आज फक्त उमेदवारी अर्ज भरा आणि प्रचाराच्या शेवटच्या सभेत थेट बारामतीकरांशी संवाद साधा. ही परंपरा अजित दादांच्या पद्धतीप्रमाणे कायम ठेवावी.”
बारामतीची परंपरा राखण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षांशी संपर्क साधून बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न केले होते, मात्र काँग्रेसने आकाश मोरे यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे बारामतीत आता थेट राजकीय सामना रंगणार आहे. आतापर्यंत या जागेसाठी १९ पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून, बारामतीकर अजित पवारांप्रमाणे सुनेत्रा पवारांनाही पाठिंबा देतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.