पराग मगर
नागपूर,
symbol of the harijan वर्ष 1933. दिवस हाेता 8 नाेव्हेंबर. शहरातील जाटतराेडी जवळील प्रभाग क्र. 17 बारासिग्नल येथील भाऊराव बाेरकर काॅलनी हा परिसर त्या काळी मेहतर लाेकांची वस्ती म्हणून ओळखला जात हाेता. येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची साेय व्हावी यासाठी महात्मा गांधी यांच्या इच्छेनुसार येथे विहीर बांधली गेली. ही बाब ऐतिहासिक हाेती. परंतु हरिजन चळवळीचे प्रतीक असलेली ही विहीर आज घाणीच्या साम्राज्यात उभी आहे.

आज ही विहीर 93 वर्षांची झाली. शहरात याही पेक्षा प्राचीन विहिरी आहेत. परंतु या विहिरीला महात्मा गांधींचा स्पर्श झाला हाेता हे विशेष. या विहिरीला लागूनच या भागाचे माजी आमदार भाेला बढेल लहानशा घरी राहतात. ते सांगतात, आज हा परिसर भंगी काे-ऑपरेटिव्ह हाऊसिंग साेसायटी म्हणून ओळखला जाताे. येथे समाजाची 75 घरे आहेत. 1932 मध्ये महात्मा गांधी यांनी सेवाग्राम येथे वास्तव्यास असताना अस्पृश्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना ‘हरिजन’ असे नाव देत ‘हरिजन सेवक संघ’ स्थापन केला. त्यांच्या अनेक वस्त्यांना भेटी दिल्या. नागपुरातील या परिसरातील अस्पृश्य समाज तेव्हा अतिशय वाईट स्थितीत जगत हाेता. नाल्याचे पाणी गरम करून ते लाेक प्यायचे असे, त्यांचे वडील जंगलू बढेल सांगत असल्याचे भाेला बढेल सांगतात. तेव्हा हा भाग मध्यप्रांतात हाेता. ही बाब महात्मा गांधींना कळताच त्यांनी वस्तीला भेट दिली. त्यांच्यासाेबत पूनमचंद्र राका हाेते. गांधींची आज्ञा प्रमाण मानत राका यांनी जंगलू बढेल यांच्या सहकार्याने तात्काळ येथे विहीर बांधायला घेतली. अवघ्या आठवडाभरात ही विहीर पूर्ण झाली आणि महात्मा गांधी यांनीच 8 नाेव्हेंबर 1933 ला या विहिरीचे उद्घाटन करून ती हरिजनांना समर्पित केली.
प्रथमच या समाजाला हक्काचे शुद्ध पाणी मिळाले. हा सर्व घटनाक्रम येथील फलकावर आजही वाचायला मिळताे. परंतु 93 वर्षांनंतर या विहिरीची गरजच न उरल्याने येथील पाणी आता पिण्यालायक राहिलेले नाही. त्यामुळे हरिजन चळवळीच्या या प्रतीकालाच आज तडे जात आहेत.
--------------
साैंदर्यीकरणाचा कपडे वाळविण्यासाठी वापर
भाेला बढेल हे 1995 मध्ये आमदार असताना त्यांच्या पुढाकाराने या विहिरीचे साैंदर्यीकरण झाले. तत्कालीन मुख्यमंत्री मनाेहर जाेशी यांच्या हस्ते पालकमंत्री नितीन गडकरी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या साैंदर्यीकरणाचे उद्घाटन झाले.symbol of the harijan तेव्हा विहिरीवर पाण्याचे फवारेही लावण्यात आले हाेते. परंतु शासन आणि परिसरातील नागरिकांच्या उदासीनतेने आज या विहिरीत घाणीचे साम्राज्य आहे. साैंदर्यीकरणाचा उपयाेग कपडे वाळविण्यासाठी हाेताे. त्यामुळे येथे इतकी प्राचीन विहीर आहे हे कुणाला लक्षातही येत नाही.
--------
हेरिटेजमध्ये समावेश व्हावा
या विहिरीचा समावेश हेरिटेज म्हणजे वारसा स्थळात व्हावा यासाठी भाेला बढेल यांनी शासनासाेबत बराच पत्रव्यवहार केला. अनेकदा मागणी केली. अधिवेशनातही विशेष बाब मध्ये हा प्रश्न लावून धरला. परंतु अद्यापही मागणी पूर्ण झाली नसल्याची खंत बढेल व्यक्त करतात.