डॉ. मनीष मुंधडा यांच्या रुग्णालयात चोरी

*कॅबिनमधून 60 हजार व दस्ताऐवज गायब *दोन चोर सीसीटीव्हीमध्ये कैद

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
चंद्रपूर,
theft-at-manish-mundhadas-hospital : चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा शहरातील नामांकित डॉक्टर मनीष मुंधडा यांच्या जटपुरा गेट भागातील दुर्गा माता मंदिरानजीकच्या रुग्णालयात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. चोरटयांनी थेट डॉक्टरांच्या दालनात प्रवेश करून सुमारे 60 हजार रुपयांची रोकड व काही दस्ताऐवज लंपास केले. ही घटना रविवारी पहाटे 3:30 वाजेच्या सुमारास घडली.
 
 
JK
 
 
 
डॉ. मुंधडा दाम्पत्याचे रूग्णालय आणि घर जटपुरा गेट परिसरातील दुर्गामाता मंदिराजवळ आहे. त्यांच्या रूग्णालयात सारखी वर्दळ असते. मात्र, रविवारी पहाटेच्या वेळी रुग्णालयात शांतता असताना चोरट्यांनी डाव साधला. रूग्णालयातील कर्मचारी व रूग्णाचे नातेवाईक झोपेत असताना कोणालाही सुगावा लागू न देता चोरटयांनी मुख्य दरवाज्यामधून डॉ. मुंधडा यांच्या रूग्णालयातील दालनात प्रवेश केला आणि तेथे असलेली 60 हजार रुपयांची रोख रक्कम आणि महत्वपूर्ण दस्तावेज चोरून नेले. चोरीची घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. यात दोन चोर रूग्णालयात येताना आणि बाहेर जाताना स्पष्टपणे दिसून येत आहेत. सकाळच्या सुमारास कॅबिनमधील सामान अस्तव्यस्त असल्याचे दिसून आल्याने चोरीची घटना उघडकीस आली.
 
 
या घटनेची तक्रार शहर पोलिस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे. सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाल्याने पोलिस त्यादृष्टीने तपास करीत आहेत. डॉ. मुंधडा यांचे रुग्णालय हे शहरातील गजबजलेल्या भागात असून, तिथे रुग्णांची नेहमीच वर्दळ असते. अशा गजबजलेल्या आणि सुरक्षित मानल्या जाणार्‍या ठिकाणी चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पहाटेच्या सुमारास डॉग स्कॉट पथक पाचारण करण्यात आले होते. अज्ञात आरोपींविरूध्द कलम 305 (ए), 331 (3), 331 (4) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शोध पथकांना सीसीटीव्ह फुटेजच्या मदतीने आरोपींची ओळख पटल्याचे सांगण्यात येत आहे.