कारंजा लाड,
Theft in front of Vardhman Plaza Complex शहरातील वर्धमान प्लाझा कॉम्प्लेससमोर सोमवार ६ एप्रिल रोजी दुपारी धाडसी चोरीची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्टेट बँकजवळ शहरातील प्रगती नगरातील सेवनिवृत्त शिक्षक किसन गोविंद ताटके हे दुचाकी वरून जात असताना त्यांना लक्ष्य करून अज्ञात चोरट्यांनी अवघ्या काही क्षणांत अडीच लाख रुपयांची रोकड लंपास केली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दुचाकीस्वार बँकेतून पैसे काढून निघाला होता. दरम्यान, वाहनाची गती कमी होताच चोरट्यांनी संधी साधत गाडीच्या साईडला लटकवलेल्या डिक्की/बॅगमधून रोकड चोरून पळ काढला. ही संपूर्ण घटना अत्यंत चतुराईने आणि वेगाने घडवून आणण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात ही चोरी पूर्वनियोजित असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भरदिवसा गजबजलेल्या भागात अशा प्रकारची चोरी घडल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिस प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, बँकेतून मोठी रक्कम काढल्यानंतर विशेष काळजी घेण्याचा तसेच बँकेतून मोठी रक्कम काढल्यानंतर एकट्याने प्रवास टाळावा,पैसे सुरक्षितपणे बॅगमध्ये ठेवून ती वाहनाच्या आत ठेवावी,संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे असा सल्ला दिला आहे.पोलीस लवकरच आरोपींना अटक करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.