गोंडपिपरी,
Accident on Gondpipri-Chandrapur road गोंडपिपरी-चंद्रपूर मार्गावरील धानापूर गावाजवळ भरधाव वेगाने येणार्या ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात पती-पत्नीचा मृत्यू झाला. तर, त्यांची सहा वर्षांची मुलगी जखमी झाली. यामुळे ती चिमुकली क्षणात पोरकी झाली असून, या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. गौतम सुरेश निमसरकर (35), वैशाली निमसरकर (32) अशी मृतक पती-पत्नीची नावे आहे. मुलगी सिया (6) गंभीर जखमी झाली आहे. तिघेही दुचाकीने चंद्रपूरवरुन आपल्या दिशेने येत असताना समोरून भरधाव वेगाने येणार्या ट्रक क्रमांक एमएच-34, एबी-2324 ने धानापूर गावाजवळ जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, गौतम निमसरकर यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच सुरजागड पेट्रोलिंग अधिकारी प्रदीप येल्लुरे आणि गोंडपिपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या वैशाली निमसरकर आणि सियाला तातडीने गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान वैशाली निमसरकर यांचाही मृत्यू झाला. या अपघातामुळे आई-वडिलांच्या छत्रछायेखाली सुखाने जगणारी सहा वर्षांची सिया एका क्षणात पोरकी झाली. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहे. निमसरकर कुटुंब हे गडचिरोली जिल्ह्यातील अनखोडा (ता. चामोर्शी) येथील रहिवासी असून, या घटनेमुळे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघातानंतर संबंधित ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला पोलिस ठाण्यातून जामीन मिळाला आहे. पुढील कारवाई ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनात गोंडपिपरी पोलिस करीत आहेत.