वॉशिंग्टन,
America's eye on the Strait of Hormuz मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नवा प्रस्ताव मांडत आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडवली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनी अत्यंत महत्त्वाच्या समुद्री मार्गावरून जाणाऱ्या जहाजांकडून शुल्क वसूल करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, या भागावर नियंत्रण मिळवल्यानंतर अमेरिका स्वतःच हे शुल्क आकारू शकते. पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, इतर देशांनी शुल्क आकारण्यापेक्षा अमेरिका स्वतःच ते का करू नये, असा त्यांचा सवाल आहे. त्यांनी यावेळी इराणविरुद्धच्या संघर्षात अमेरिका वरचढ ठरत असल्याचा दावाही पुन्हा एकदा केला.
जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार
दरम्यान,इराण मात्र अजूनही प्रतिकार करत असून या प्रदेशात तणाव कायम आहे. विविध प्रकारच्या हल्ल्यांद्वारे इराणकडून प्रत्युत्तर दिले जात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे संघर्ष अद्याप पूर्णपणे संपलेला नसल्याचे चित्र दिसून येते.होर्मुझची सामुद्रधुनी ही आखाती देशांना हिंद महासागराशी जोडणारी महत्त्वाची जीवनवाहिनी मानली जाते. या मार्गातून जगातील मोठ्या प्रमाणात खनिज तेल आणि वायू वाहतूक केली जाते. त्यामुळे या मार्गावरील कोणतीही हालचाल जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी ठरू शकते. अमेरिकेने इराणसमोर काही अटी ठेवल्या असून या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे शुल्क आकारण्याचे विधान हे परिस्थिती अधिक चिघळवणारे ठरू शकते, अशीही चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू झाली आहे.