अनिल कांबळे
नागपूर,
robbery सात ते आठ सशस्त्र दराेडेखाेरांनी भर दिवसा घरात घुसून अल्पवयीन मुलाच्या गळ्याला चाकू लावत दराेड्याचा प्रयत्न केला. शेजारी महिलेच्या प्रकार लक्षात येताच तिने आरडाओरड केल्याने आराेपी हाती लागलेले 40 हजार रुपये घेऊन पळाले.
सतीश परमेश्वर गडपायले (53, वेलकम साेसायटी, दाभा) असे तक्रारदाराचे नाव आहे. 3 एप्रिल राेजी ते कामानिमित्त दुपारी बाहेर गेले हाेते. 1.20 वाजता त्यांचा 17 वर्षीय मुलगा हाॅलमध्ये टीव्ही पाहत हाेता. तर त्याची आई खाेलीत आराम करीत हाेती. अर्धवट लाेटलेला घराचा दरवाजा उघडून आठ आराेपींनी आत प्रवेश केला. त्यांचे चेहरे कापडाने झाकले हाेते व त्यांच्या हातात चाकू हाेते. दाेघांनी गडपायले यांच्या मुलाला पकडले व त्याच्या गळ्याला चाकू लावला. त्यांनी त्याला घरातील पैसे व दागिने कुठे आहेत, याची विचारणा केली. घाबरलेला मुलगा त्यांना खाेलीत नेत असताना शेजारील महिलेला दरवाजातून हा प्रकार दिसला. मुलाच्या गळ्याला चाकू लावलेला पाहताच तिने आरडाओरड केली. त्यामुळे आराेपी पळून गेले.robbery तर मुलाच्या गळ्याला चाकू लावलेल्या दाेघांनी कपाटातून 40 हजारांची राेख रक्कम काढून पळ काढला. आराेपी निळ्या रंगाच्या मारुती स्विफफ्ट कार व माेटारसायकलने आले हाेते, असे संबंधित महिलेने सांगितले. तातडीने गडपायले यांना फोन करण्यात आला. गडपायले यांच्या तक्रारीवरून अज्ञात आराेपींविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अथर्व नानाेरेच्या हत्याकांडामुळे चर्चेत आलेल्या गिट्टीखदान पाेलिस ठाण्याच्या हद्दीतच दाेन दिवसांअगाेदर हा प्रकार घडला, हे विशेष.