नाशिक,
kharat-case : नाशिकमध्ये भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अशोक खरात नावाच्या व्यक्तीवर आतापर्यंत १२ गुन्हे दाखल झाले असून, त्यापैकी बहुतांश गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथक (SIT) करत आहे.
तपासात असे समोर आले आहे की, आरोपी स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवत महिलांना जाळ्यात ओढत होता. त्यांच्या कुटुंबावर संकट येईल, मृत्यू होऊ शकतो अशी भीती दाखवून तो त्यांना मानसिकदृष्ट्या दबावत असे. या भीतीचा फायदा घेत त्याने अनेक महिलांचे शोषण केल्याचा आरोप आहे.
मंदिर परिसरातही तो हातचलाखीचे प्रयोग करून लोकांना फसवत होता. खडे, रुद्राक्ष, पूजा-विधी यांचा आधार घेत तो अंधश्रद्धा पसरवत होता आणि त्यातून पैसे उकळत होता.
या प्रकरणात आतापर्यंत ३० पेक्षा जास्त साक्षीदार आणि पीडितांची चौकशी करण्यात आली आहे. SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी सांगितले की, पीडित महिला आणि त्यांच्या कुटुंबांनी मोठ्या धाडसाने पुढे येत तक्रारी दिल्या आहेत. त्यामुळेच आरोपीविरुद्ध कारवाई शक्य झाली आहे.
या सर्व प्रकरणात पीडितांची ओळख गुप्त ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियावर त्यांचे फोटो किंवा व्हिडिओ शेअर न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित ४ हजारांहून अधिक सोशल मीडिया लिंक्स तपासात आढळल्या असून, आक्षेपार्ह माहिती पसरवणारी ४९१ अकाउंट्स बंद करण्यात आली आहेत.
१७ मार्च २०२६ रोजी पहिला गुन्हा दाखल झाला असून, कायद्यानुसार ६० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करणे आवश्यक आहे. त्यामुळे पुढील ४० ते ४५ दिवसांत तपास पूर्ण करून चार्जशीट सादर करण्याची तयारी सुरू आहे.
तपासादरम्यान सहआरोपींचाही शोध घेतला जात असून, पुरावे मिळाल्यास त्यांच्यावरही कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच आर्थिक व्यवहारांच्या तपासासाठी अंमलबजावणी संचालनालय (ED) देखील या प्रकरणाकडे लक्ष देत आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अंधश्रद्धेला बळी न पडता सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.