नागपूर,
ishwari crosses the palk strait धैर्य व जिद्दीचा असाधारण आविष्कार घडवत, नागपूरची 17 वर्षीय दृष्टिहीन जलतरणपटू ईश्वरी कमलेश पांडे हिने आज (6 एप्रिल) ‘पाल्क सामुद्रधुनी’ यशस्वीरित्या पार करून इतिहास रचला. हा पराक्रम करणारी ती जगातील पहिली दृष्टिहीन जलतरणपटू ठरली आहे.
ईश्वरीने आपल्या पोहण्याच्या मोहिमेची सुरुवात श्रीलंकेतील तलाईमन्नारजवळील ‘उरमालाई पॉईंट’ येथून पहाटे 4 वाजता केली. दुपारी 3:15 वाजता ती अरिचलमुनई, धनुष्कोडी (भारत) येथे पोहोचली. अशा प्रकारे तिने हा आव्हानात्मक प्रवास 11 तास 15 मिनिटांत पूर्ण केला. समुद्रातील जोरदार प्रवाह, बदलत्या लाटा व जेलीफिशचा सामना करत तिने संपूर्ण प्रवासात विलक्षण सहनशक्ती, मानसिक कणखरता प्रदर्शित केली.
राष्ट्रीय स्तरावरील पॅरालिम्पिक जलतरणपटू व सुवर्ण पदक विजेती ईश्वरीने, खुल्या पाण्यातील आव्हानांमध्ये आपली क्षमता सातत्याने सिद्ध केली आहे. जन्मापासून दृष्टिहीन असूनही, ती जिद्द व अढळ निश्चयाचे एक प्रेरणादायी प्रतीक म्हणून समोर आली आहे.
अरुणा व कमलेश पांडे यांची ती कन्या आहे. तिच्या यशात त्यांच्या अविरत पाठिंब्याने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या ऐतिहासिक जलतरण मोहिमेचे आयोजन ‘ओपन वॉटर स्विमिंग अॅकॅडमी, थेनी’द्वारे करण्यात आले होते. सुरक्षेची व्यापक व्यवस्था करण्यात होती.ishwari crosses the palk strait या मोहिमेसाठी अधिकृत निरीक्षक म्हणून एम. विजयकुमार (निरीक्षक, पॅरा स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया) व जयकुमार एम. (निरीक्षक, तामिळनाडू राज्य पाण्याखालील क्रीडा संघटना) यांनी काम पाहिले. तिला नागपूरचे संजय पुरुषोत्तम बटवे यांनी प्रशिक्षण दिले. बोटींच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मारिया रॉजर यांनी सांभाळली.
-----------------------------------