रेल्वेच्या अकाऊन्टंटविरोधात सीबीआयच्या पथकाची कारवाई
नागपूर,
Bribe of two thousand ट्रॅकमॅनकडून दोन हजारांची लाच घेताना रेल्वेच्या अकाऊन्टंटविरोधात सीबीआयकडून रंगेहाथ कारवाई करत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित अकाऊन्टंट मध्य रेल्वेच्या भुसावळ येथील विभागीय वित्त व्यवस्थापक कार्यालयात कार्यरत आहे. सीबीआय नागपूरच्या पथकाने ही कारवाई केली.
Bribe of two thousand संजीत कुमार असे आरोपी नाव आहे. तक्रारदार ट्रॅकमन अकोला जिल्ह्यात कार्यरत आहे. एमएससीपी अंतर्गत त्याचा ५८ हजार ७०० रुपयांचा एरिअर्स थकीत होता. त्याबाबतचा प्रस्ताव मुर्तीजापूर कार्यालयातून भुसावळला पाठविण्यात आला होता. तक्रारदाराने १३ मार्च रोजी संबंधित कामासाठी संजीत कुमारची भेट घेतली. परंतु संजीतने त्यांना फाईलवर प्रक्रिया करण्यासाठी पाच हजारांची मागणी केली. जर पैसे दिले तर प्रस्ताव तेथेच धूळ खात पडला राहील अशी धमकीदेखील दिली. आपल्याच हक्काच्या पैशांसाठी लाच देण्याची इच्छा नसल्याने ट्रॅकमॅनने ६ एप्रिल रोजी थेट सीबीआय कार्यालयाला पत्र लिहून तक्रार केली. त्यानंतर सीबीआयच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली. संजीत कुमारने तक्रारदाराला दोन हजारांत काम करून देईल असे सांगितले. सीबीआयच्या पथकाने कारवाई करत संजीत विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली असून त्याने आणखी किती कर्मचार्यांकडून अशा प्रकारे पैसे उकळले याचा तपास सुरू आहे.