नवी दिल्ली,
Campbell Wilson's resignation देशातील प्रमुख विमान कंपनी एअर इंडियामध्ये नेतृत्व बदलाच्या हालचाली सुरू झाल्याचे समोर आले आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असला तरी, नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती होईपर्यंत ते पदावर कायम राहणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.कंपनीसमोर सध्या कामकाजातील अडथळे, वाढती आर्थिक जबाबदारी आणि यंदा संभवणाऱ्या आर्थिक मंदीचे आव्हान उभे आहे. अशा पार्श्वभूमीवर अलीकडेच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत विल्सन यांचा राजीनामा स्वीकारण्यात आल्याचे समजते. त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार होता.

विल्सन यांनी करार संपल्यानंतर पुढे काम न करण्याची इच्छा यापूर्वीच व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या शोधाला यंदाच्या सुरुवातीपासूनच गती देण्यात आली होती. दरम्यान, कंपनीने या घडामोडींवर अधिकृत प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली आहे.या प्रकरणाशी संबंधित आणखी एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, नव्या प्रमुखाच्या निवडीसाठी संभाव्य उमेदवारांशी चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पुढील आठवड्यात यासंदर्भात महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता असून, पूर्ण सेवा देणाऱ्या विमान कंपन्यांतील अनुभवी प्रमुखांचा विचार केला जात असल्याचे संकेत मिळत आहेत.