प्रसिद्ध क्रिकेटर डेव्हिड वॉर्नर अटक!

    दिनांक :07-Apr-2026
Total Views |
इस्लामाबाद,
David Warner arrested पाकिस्तान सुपर लीगदरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज डेव्हिड वॉर्नर एका गंभीर कायदेशीर प्रकरणात अडकला आहे. वॉर्नरवर दारू पिऊन वाहन चालवल्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्याला अटक केली, परंतु नंतर तात्पुरती सुटका करण्यात आली. सध्या वॉर्नर कराची किंग्स संघाचा कर्णधार म्हणून पीएसएलमध्ये सामील आहे. सामन्यांमुळे त्याच्या फ्रँचायझीला काही दिवसांची सुट्टी होती, त्यामुळे तो कुटुंबासोबत ऑस्ट्रेलियाला गेला होता.वृत्तानुसार, ५ एप्रिलच्या रात्री सिडनीच्या मारुब्रा परिसरात पोलिसांनी त्याची श्वास चाचणी घेतली. चाचणीमध्ये त्याच्या शरीरातील अल्कोहोलची पातळी कायदेशीर मर्यादेपेक्षा जवळपास दुप्पट आढळली.
 
David Warner arrested
 
पोलिसांच्या अधिकृत निवेदनानुसार, वॉर्नरने चाचणी स्थळी पोहोचण्यापूर्वी आपली गाडी पार्क केली होती. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्याची श्वास चाचणी केली, जिचा निकाल पॉझिटिव्ह आला आणि त्याला मारुब्रा पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. दुसऱ्या चाचणीतही शरीरातील अल्कोहोलची पातळी ०.१०४ नोंदली गेली.वॉर्नरला ७ मे रोजी डाउनिंग सेंटर लोकल कोर्टात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. डेव्हिड वॉर्नरने २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यानंतर तो मीडिया आणि फ्रँचायझी क्रिकेटकडे लक्ष देत आहे. आपल्या कारकिर्दीत वॉर्नरने १०० हून अधिक कसोटी सामने खेळले आणि ऑस्ट्रेलियाला अनेक महत्त्वाचे विजय मिळवून दिले आहेत. या प्रकरणाचा न्यायालयीन निकाल वॉर्नरच्या कारकिर्दीवर आणि प्रतिमेवर कसा परिणाम करतो, हे आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.