बुलढाणा,
pravin-kumar-deore : जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात ६ एप्रिल रोजी मावळते जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला, तर नूतन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे प्रशासनाच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. मावळत्या जिल्हाधिकार्यांनी सुरू केलेली विकासकामे अधिक वेगाने पुढे नेण्याचा संकल्प डॉ. देवरे यांनी व्यक्त केला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, अप्पर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, डॉ. पाटील यांच्या पत्नी शीला पाटील, तसेच सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, विविध विभागांचे विभाग प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नूतन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी यावेळी म्हणाले, बुलढाणा जिल्ह्यातील पूर्वीचा कामाचा अनुभव गाठीशी असल्याने मला येथील परिस्थितीची जाण आहे. आगामी काळात निर्यात, कृषी, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांवर विशेष भर देऊन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा मानस आहे. डॉ. पाटील यांनी घडवलेली अधिकार्यांची पथके जबरदस्त असून त्यांच्या सहकार्याने विकासाचा ध्यास पूर्ण करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मावळते जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आपल्या निरोपपर भाषणात जिल्ह्यातील अधिकार्यांच्या एकजुटीचे आणि कार्यपद्धतीचे कौतुक केले. ते म्हणाले आज महाराष्ट्रात बुलढाणा जिल्हा विकासकामांमध्ये अग्रेसर आहे, असे त्यांनी अभिमानाने सांगितले. अधिकार्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी कामाचे नियोजन, पूर्वतयारी, पारदर्शकता आणि नियमित वृत्तपत्र वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले.
पशुसंवर्धन आयुक्तपदी पदोन्नतीबद्दल बोलताना, मुया प्राण्यांची सेवा ही पुण्याची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. डॉ. पाटील यांच्या कार्यकाळात जलयुक्त शिवार, महसूल सुधारणा, लोणार सरोवर संवर्धन आणि दस्तावेजांचे डिजिटायझेशन, महसूल मित्र, सुलभ चॅटबॉट सेवा, ई-महसूल, डॅशबोर्ड, सहज प्रणाली इ. सारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे जिल्ह्याने लक्षणीय प्रगती साधली आहे. स्वागत व निरोप सभारंभाला उपस्थितांनी डॉ. किरण पाटील यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत नूतन जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महसूल तहसीलदार वृषाली केसकर यांनी केले.