जनगणनेचे काम अचूक, पारदर्शक आणि गांभिर्याने करा

जिल्हाधिकारी कुंभेजकर यांचे वक्तव्य क्षेत्रीय प्रशिक्षक प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ

    दिनांक :07-Apr-2026
Total Views |
वाशीम,
District Collector Kumbhejkar जनगणनेचे काम हे राष्ट्रीय कर्तव्याचा भाग आहे. जनगणनेची संपूर्ण प्रक्रिया डिजीटल पध्दतीने करण्यात येत आहे. त्यामुळे क्षेत्रीय प्रशिक्षकांनी जनगणनेचे काम अचूक, पारदर्शकपणे आणि गांभिर्याने काम करावे, अश्या सुचना जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिल्या. जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज होत असून, क्षेत्रीय प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ ६ एप्रिल रोजी राजस्व सभागृहात उत्साहात झाला. जनगणना संचालनालय, महाराष्ट्र तसेच जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी, वाशीम यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी विश्वनाथ घुगे, नगरपालिका सहआयुक्त डॉ. बाबुराव बिक्कड, मास्टर ट्रेनर डॉ. राजेश गवई, कार्तिक गडलिंग, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी जयेश खंडारे, जिल्हा समन्वयक शशांक रूखने, ऋषिकेश पाथरे आदी उपस्थित होते.
 
 
 

District Collector Kumbhejkar 
 
जिल्हाधिकारी पुढे बोलतांना म्हणाले,शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आणि ठराविक वेळेत जनगणनेचे काम करणे आवश्यक आहे. संबंधित अधिकारी कर्मचार्‍यांनी जनगणनेबाबत असलेले प्रशिक्षण गांभिर्याने करावे. यंदाची जनगणना पूर्णपणे डिजिटल माध्यमातून पार पडणार असल्याने मोबाईल अ‍ॅपद्वारे माहिती संकलन अधिक अचूक, जलद आणि पारदर्शक होणार आहे. त्यानुसार फील्ड ट्रेनर्सना तांत्रिक व प्रात्यक्षिक स्वरूपाचे प्रशिक्षण दिले जात असून, याचा प्रत्यक्ष लाभ क्षेत्रीय पातळीवर होईल. या दोन दिवसीय प्रशिक्षणादरम्यान मास्टर ट्रेनरकडून क्षेत्रीय प्रशिक्षकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर हे क्षेत्रीय प्रशिक्षक तालुका स्तरावर प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत.या प्रशिक्षणात जनगणना प्रक्रिया प्रभावीपणे कशी राबवावी, मोबाईल अ‍ॅपचा वापर कसा करावा, तसेच नागरिकांकडून माहिती संकलन करताना विचारण्यात येणार्‍या प्रश्नांची योग्य हाताळणी कशी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.जिल्ह्यातील सर्व तालुके, नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात प्रगणक व पर्यवेक्षक यांच्या माध्यमातून जनगणनेचे कार्य पार पाडले जाणार आहे.