चंद्रपूर,
Dr. Mundhadha Hospital thief चंद्रपूर शहरातील मध्यभागी असलेल्या सुप्रसिध्द मुंधडा हॉस्पिटलमध्ये रविवार, 5 एप्रिलला पहाटे 3.30 वाजता 2 अज्ञात व्यक्तींनी डॉ. मनीष मुंधडा यांच्या दालनातील कागदपत्रे व रोख रक्कम पळवली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणातील एका आरोपीला अटक केली आहे. श्रीकांत उर्फ बोटतुट्या राजू चुनारकर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. 4 एप्रिल रोजी कान, नाक व घसा तज्ज्ञ डॉ. मनीष मुंधडा हे नेहमीप्रमाणे रुग्णालयातील ओपीडीमधील रुग्णांची तपासणी करीत होते. त्यानंतर ते घरी गेले. मात्र, 5 एप्रिलच्या भल्या पहाटे त्यांच्या केबिनमध्ये 2 अज्ञात युवकांनी प्रवेश करीत लाकडी आलमारीमधील 60 हजार रुपये लांबविले. गुन्ह्याचे गांभीर्य बघता पोलिस अधीक्षकांनी या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी गुन्हे शाखेला आदेश दिले.
गुन्हे शाखेच्या पथकाने आधी परिसरातील व रुग्णालयातील सीसीटीव्ह फुटेज तपासले. आरोपींचा शोध घेताना गुन्हेगार 23 वर्षीय श्रीकांत उर्फ बोटतुट्या राजू चुनारकर (रा. आनंदनगर, महाकाली कॉलरी, चंद्रपूर) असल्याचे लक्षात आले. त्याला ताब्यात घेतले गेले. आरोपीजवळून चोरी गेलेली रक्कमही जप्त करण्यात आली. गुन्ह्यातील दुसरा आरोपी अतुल उर्फ मुजोर विकास राणा (25, रा. शामनगर) याचा शोध पोलिस घेत आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलिस उपनिरीक्षक सुनील गौरकार आदींनी केली.