खत दरवाढीचा शेतकर्‍यांना मोठा फटका

प्रति बॅग १२५ ते ३०० रुपयांची वाढ

    दिनांक :07-Apr-2026
Total Views |
कारंजा लाड, 
Fertilizer price hike hits farmers hard नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून शेतकर्‍यांवर आर्थिक भार वाढला असून, रासायनिक खतांच्या किमतीत झालेल्या मोठ्या वाढीमुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी संकटात सापडला आहे. १ एप्रिलपासून लागू झालेल्या या दरवाढीनुसार खतांच्या दरात प्रति बॅग १२५ ते ३०० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. खरीप हंगामासाठी बी-बियाणे आणि खतांची जुळवाजुळव सुरू असतानाच झालेल्या या दरवाढीमुळे शेतकर्‍यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडण्याची चिन्हे दिसत आहेत. आधीच शेतीमालाला अपेक्षित दर मिळत नसताना वाढत्या खर्चामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. खतांच्या दरवाढीचा थेट परिणाम शेतीच्या उत्पादन खर्चावर होत असून, एकरी खर्चात सुमारे ६ ते १५ हजार रुपयांपर्यंत वाढ होण्याची शयता आहे. त्यामुळे शेती करणे अधिकच खर्चिक बनत असून, लहान व मध्यम शेतकर्‍यांसाठी ही परिस्थिती चिंताजनक ठरत आहे. दरम्यान, डीएपी आणि टीएसपी या महत्त्वाच्या खतांच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्याने शेतकर्‍यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, इतर खतांच्या दरवाढीमुळे एकूणच खर्चाचा ताण कायम आहे.
 
 

Fertilizer price hike hits farmers hard 
 
 
दरवाढीनंतर बाजारात जुन्या दराचा साठा असतानाही काही ठिकाणी वाढीव दराने विक्री होण्याची शयता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे खत टंचाई व काळाबाजार होण्याची भीती निर्माण झाली आहे.कृषी विभागाने शेतकर्‍यांना खत खरेदी करताना पक्की पावती घेण्याचे आणि दरांची खातरजमा करण्याचे आवाहन केले आहे. तसेच प्रशासनाने साठा व विक्रीवर कडक नजर ठेवावी, अशी मागणीही पुढे येत आहे.खतांच्या दरवाढीमुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांच्या संकटात भर पडली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर झालेली ही वाढ शेतकर्‍यांसाठी मोठा धक्का मानली जात असून, शासनाने तातडीने हस्तक्षेप करून दिलासा देण्याची गरज व्यक्त होत आहे.
 
 
 
प्रमुख खतांच्या दरात झालेली वाढ
एनपीके (२०:२०:०:१३) सुमारे ३०० रुपये वाढ, १०:२६:२६ सुमारे २२५ रुपये वाढ, १२:३२:१६ सुमारे २२५ रुपये वाढ, १४:३५:१४ सुमारे २२५ रुपये वाढ, १९:१९:१९ सुमारे २२५ रुपये वाढ, एमओपी सुमारे १२५ रुपये वाढ. शिवाय २०:२०:०:१३ या खताच्या दरात सर्वाधिक वाढ झाली असून, हे खत कडधान्ये व इतर पिकांसाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.