इतवारा परिसरातील चार दुकानांना आग

*संपूर्ण माल जळून कोळसा झाल्याने मोठे नुकसान

    दिनांक :07-Apr-2026
Total Views |
वर्धा, 
four-shops-set-on-fire : शहरातील इतवारा भागातील फ्रूट मार्केट परिसरात आज मंगळवार ७ रोजी पहाटे चार दुकानांना भीषण आग लागली. या आगीत दुकानांतील संपूर्ण माल जळून खाक झाल्याने व्यापार्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
 
 
 
FIRE
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास अचानक बाजारात आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. आगीने शेजारील दुकानांनाही आपल्या कवेत घेतले. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाला मिळताच पथक घटनास्थळी दाखल झाले. आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या आगीत छमू शेख, रवी चावरे, शकील रिजवी, हरीश केवढे तसेच शेख शोएब यांचे मोठे नुकसान झाले आहे. जळालेल्या दुकानांमध्ये फळ, भंगार आणि मसाल्यांच्या दुकानांचा समावेश आहे.
 
 
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या वेळी वर्धा नगर परिषदचे अग्निशमन दल तत्काळ उपलब्ध झाले नव्हते. फळ व्यापारी नौशाद रशीद खान यांनी नगर परिषदेशी संपर्क साधला असता अग्निशमन बंब इंझापूर येथील डम्पिंग यार्डमध्ये असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर व्यापार्‍यांनी स्वतःच ते वाहन घटनास्थळी आणले. अग्निशमन दल येण्यापूर्वी स्थानिक नागरिक आणि व्यापार्‍यांनी बोअरवेलच्या पाण्याच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. नंतर घटनास्थळी पोहोचलेल्या दोन अग्निशमन बंबाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. आग विझविण्यासाठी अभिजीत त्रिवेदी, परवेज खान, इमरान कैसर, मलिक, अब्दुल रफिक, सोनू कांबळे, कमर अली, शुभम आदींनी सहकार्य केले.