कोरची आश्रम शाळेत ‘आर्ट ऑफ गॅलरी’ हस्तकला मेळावा

    दिनांक :07-Apr-2026
Total Views |
कोरची,
Gathering at Korchi Ashram School विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, कोरची येथे ‘आर्ट ऑफ गॅलरी’ या हस्तकला मेळाव्याचे व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या बहुउद्देशीय सभागृहात भरलेल्या या प्रदर्शनाने कलारसिकांची मने जिंकली. या कला मेळाव्याचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते आशिष अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक उमाकांत ढोक होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हिरालाल उईके, सविता फुलकवर, भैयालाल कुरसंगे, हरेश कामडी, प्रमोद शंभरकर, अरुण कायंदे, अभिमन्यू वाटगुरे, राहुल अंधारे, क्रिष्णा गावडे, कुणाल गोवर्धन, गुरुराज मेंढे, गीता राऊत, चंद्रकांता पटले, मनोज आचार्य, सुमन अडभैया, भूमेश शेंडे आणि अधीक्षिका सीमा कुरेकार उपस्थित होते.
 
 

Gathering at Korchi Ashram School 
 
 
यावेळी बोलताना ते म्हणाले, कला हा उपजत गुण आहे. आश्रम शाळेतील या चिमुकल्या हातांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास, भविष्यात हे विद्यार्थी उत्कृष्ट कलाकार म्हणून नाव लौकिक मिळवू शकतात, असे म्हणाले. कलाशिक्षक ओमप्रकाश रहिले यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता 4 थी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत आकर्षक कलाकृती साकारल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने आदिवासी वारली पेंटिंग, परंपरेचा वारसा जपणारी चित्रे, मातीतून साकारलेल्या रेखीव मूर्ती, कल्पकता आणि सौंदर्याचा अजोड संगम, सौंदर्यदृष्टी आणि विविध माध्यमांचा प्रभावी वापर या निकषांवर या सर्व कलाकृती सर्वोत्तम ठरल्या. यावेळी जेईई परीक्षेत यश संपादन करणार्‍या मानव हिरालाल उईके आणि भाग्यश्री सूरज फुलकवर या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कलाशिक्षक ओमप्रकाश रहिले यांनी केले. संचालन सुषमा आंबोणे यांनी तर आभार भूमेश शेंडे यांनी मानले. या मेळाव्यामुळे परिसरात विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.