भंडारा,
Government health system in Bhandara शासकीय रुग्णालये केवळ वाद विवादासाठीच नव्हे तर चांगले सेवेसाठीही ओळखले जातात, हे भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाने दाखवून दिले. आरोग्य विभागाच्या कामगिरीचे विश्लेषण करताना जिल्हा सामान्य रुग्णालयाने ११ महिन्याच्या कालावधीत १० लाख बाह्यरुग्णांवर उपचार व ३६ हजार रुग्णांवर शस्त्रक्रीया केल्याचे स्पष्ट झाले आहे. एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या ११ महिन्यांच्या कालावधीत ही कामगिरी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांनी १० लाख ८ हजार ८१ बाह्यरुग्णांना सेवा देऊन ग्रामीण आरोग्याचा कणा मजबूत असल्याचे सिद्ध केले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयांच्या माध्यमातून मिळालेल्या आकडेवारीतून आरोग्य व्यवस्थेची व्याप्ती समोर आली आहे.

सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाने सर्वाधिक २,७९,०१६ बाह्यरुग्णांची नोंद केली आहे. विशेष म्हणजे, येथे ३६,८०८ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या, तर २,८४९ छोट्या शस्त्रक्रीया पार पडल्या. प्रसूती सुविधेचा विचार करता, ३,४११ नैसर्गिक प्रसूती आणि ४,९३७ सिझेरियन शस्त्रक्रीया पार पडल्या आहेत, जे जिल्ह्यातील प्रगत वैद्यकीय सेवेचे निदर्शक आहे. बाह्यरुग्ण संख्येत तुमसर उपजिल्हा रुग्णालय १,६४,८०३ रुग्णांसह दुसèया क्रमांकावर आहे. येथे ८,१५४ मोठ्या शस्त्रक्रीया आणि १,१७८ प्रसूती पार पडल्या. डायलेसिस सुविधेतही १८०७ सत्रांसह या रुग्णालयाने मोठी मजल मारली आहे.
साकोली येथे ७९,९७१ बाह्यरुग्णांची तपासणी करण्यात आली. येथे प्रयोगशाळा चाचण्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये मोहाडी ९०,९२७ आणि पवनी ८७,९९७ येथे रुग्णांचा राबता सर्वाधिक दिसून आला. लाखांदूरमध्ये ५४,४५९ तर लाखनीमध्ये ६५,०६१ बाह्यरुग्णांवर उपचार झाले. अड्याळ ५७,३८० आणि पालांदूर ४५,४३३ रुग्णांची तपासणी करुन उपचार करण्यात आले. सिहोरा ग्रामीण रुग्णालयात ४९,७३२ बाह्यरुग्णांची नोंद झाली आहे. जिल्हा रुग्णालयाने केवळ उपचारच नाही, तर निदानातही आघाडी घेतली आहे. वर्षभरात १३,५४४ सोनोग्राफी, १२,६९९ सिटी स्कॅन आणि ४,३८३ एमआरआय चाचण्या करण्यात आल्या. डायलेसिसच्या क्षेत्रातही ५,९२५ रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. प्रयोगशाळा चाचण्यांचा विचार करता, जिल्ह्यात एकूण ५,२४,१५३ अंतर्गत चाचण्या आणि ८,७२,९१३ बाह्यस्त्रोत चाचण्या अशा एकूण १३ लाख ९७ हजारांहून अधिक चाचण्या पार पडल्या आहेत.
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांवर जनतेचा विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे,़ हेच या कामगिरीवरुन दिसते, अशी प्रतिक्रीया जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संदीप गजभिये यांनी दिली.